शिक्षण, आरक्षण, संरक्षणासाठी माझी उमेदवारी : इस्माईल पटेल
मुस्लिम समाजाच्या अनेक प्रश्नांवर वेळोवेळी आंदोलन उपोषण व शासन दरबारी निवेदन दिले. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ कर्जमुक्ती साठी, प्रत्येक गावात मुस्लिम कब्रस्तान साठी, वक्फ महामंडळाच्या च्या जागेसाठी मी कायम शासन दरबारी प्रयत्न करत आलो आहे.
– इस्माईल पटेल
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : मुस्लिम, ओबीसी, दलित, भटके – विमुक्त, आदिवासी व इतर दुर्लभ घटकांच्या शिक्षण, आरक्षण, संरक्षणासाठी मी बार्शी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याचे मौलाना आजाद विचार मंचचे जिल्हाध्यक्ष इस्माईल पटेल यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र राज्यात ओबीसी, व्हीजेएनटी, एस.टी.प्रवर्गात सवलतीस पात्र असलेल्या किमान ६२ जमाती या मुस्लिम धर्मिय आहेत.मुस्लिमांच्या एकूण लोकसंख्येच्या ८५% या जमातींची जनसंख्या आहे.पण या जमातींचा सत्तेतील हिस्सा नगण्य आहे. मुस्लिम ओबीसी जमातींच्या न्याय हक्कासाठी मी विधानसभेच्या रिंगणात उतरलो आहे.
गेल्या दहा वर्षांत मुस्लिम समाजाच्या पुढे सीएए -ज्ञएनआरसीचा मुद्दा, ऐतिहासिक इमारतींवर दावा, कश्मीर प्रश्न, राष्ट्रवाद, लव जिहाद, लॅन्ड जिहादच्या अफवा, मुस्लिम आरक्षण, मदरसे आदी प्रश्न उपस्थित करून मुस्लिम समाजाची प्रतिमा मलीन करीत जातीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला. हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण करुन मुस्लिम समाजाची धर्म,भाषा,संस्कृती आणि इतिहास संपवण्याचा प्रयत्न सातत्याने होत असून या साठी मी विधानसभेत आवाज उठवणार आहे. राज्यात अल्पसंख्याक पंधरा कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी, प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत मुस्लिम विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, जिल्हास्तरीय शासकीय वसतीगृहे, वक्फ जमिनीचा मुस्लिम समाजाच्या शिक्षण व रोजगारासाठी सदुपयोग, मुस्लिम समाजातील ओबीसी, भटके-विमुक्त, आदिवासी प्रवर्गातील जमातींना योग्य न्याय व वाटा, जनसंख्येनुसार अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय झुंड हत्याविरोधी दलाची स्थापना, मदरसा शिक्षणास संरक्षण आदी प्रश्नांवर माझी आग्रही भुमिका असणार आहे. मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही मी कायम प्रयत्नशील राहील असे परखड मत इस्माईल पटेल यांनी यावेळी व्यक्त केले.