अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावीप्रदीप पवार
B1न्यूज मराठी नेटवर्क
नंदुरबार, दिनांक 18 फेब्रूवारी, 2026 : ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आपली माहिती आणि ई-केवायसी (eKYC) मुदत 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत सादर करावी असे आवाहन तहसीलदार प्रदीप पवार यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकानुसार केले आहे.
तालुक्यातील 31 हजार 229 पात्र शेतकऱ्यांपैकी केवळ 19 हजार 100 शेतकऱ्यांनी आवश्यक माहिती जमा केली आहे. अद्याप अनेक शेतकऱ्यांनी कागदपत्रे जमा केलेली नाहीत. माहिती सादर करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2026 असून, मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या माहितीचा किंवा अर्जाचा विचार केला जाणार नाही. निधी शासनाकडे परत जाईल.
पात्र शेतकऱ्यांनी पुढील 03 दिवसांच्या आत आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांच्याकडे बँक पासबुकची छायांकित प्रत (बँक तपशीलासह), आधार कार्डची छायांकित प्रत व आधार लिंक असलेला मोबाईल नंबर त्वरीत जमा करावीत.
कोणत्याही शेतकऱ्याने विहित मुदतीत माहिती सादर केली नाही आणि ई-केवायसी पूर्ण केली नाही, तर ते लाभापासून वंचित राहतील आणि त्यास सर्वस्वी संबंधित शेतकरी जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी, असेही तहसिलदार पवार यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.





