शेतकऱ्यांसाठी संशोधन अधिक गतिमान करा – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
“फुले कृषी महोत्सव-२०२६” शेतपीक प्रात्यक्षिके, शिवार फेरी व कृषी प्रदर्शनाचा शुभारंभ
B1न्यूज मराठी नेटवर्क
अहिल्यानगर, दि. १८ : राज्यातील शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे, शेतकऱ्यांना हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी सक्षम करणे आणि शेतमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे या त्रिसूत्रीवर शासनाचा भर आहे. कृषी विद्यापीठांनी संशोधन अधिक गतिमान करून शेतकऱ्यांच्या गरजेनुसार सुधारित वाण, हवामान अनुकूल तंत्रज्ञान आणि पीक संरक्षण उपाय अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कृषी विद्यापीठ, कृषी विभाग (महाराष्ट्र शासन) व आत्मा (अहिल्यानगर) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि उमेद अभियान, जिल्हा परिषद अहिल्यानगर, महाबीज, नाबार्ड, पाणी फाऊंडेशन आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्याने कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरात ‘फुले कृषी तंत्रज्ञान घरोघरी, समृद्धी येईल गावोगावी’ या उपक्रमांतर्गत ‘फुले कृषी महोत्सव -२०२६’, थेट पीक प्रात्यक्षिके, शिवार फेरी व कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन कृषीमंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, माजी आमदार प्राजक्त तनपुरे, कृषी परिषदेचे उपाध्यक्ष तथा सेवा प्रवेश मंडळाचे अध्यक्ष तुषार पवार, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, कृषी परिषदेच्या महासंचालक श्रीमती वर्षा लढ्ढा-उंटवाल, पुणे येथील विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गवसाने, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, कुलसचिव राजेंद्रकुमार पाटील, नियंत्रक सदाशिव पाटील, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, अण्णासाहेब बाचकर, बाळासाहेब जठार व बाळासाहेब आढाव उपस्थित होते.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेत शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शासनामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. पेरणीपासून ते विपणनापर्यंत शेतकऱ्यांना प्रत्येक टप्प्यावर मदत कशी करता येईल, यावर शासनाचा भर आहे. साडेसात हॉर्सपॉवरपर्यंतच्या मोटारीचे देयक शासनाने माफ केले आहे. यासाठी शासनाने ३१ हजार कोटी रुपये निधी दिला आहे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजना, नवनवीन तंत्रज्ञान हे शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू केला असून याचा अधिकाधिक उपयोग करून शेतीमध्ये अधिक उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.”
केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबवत असून त्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभाग आणि आत्मा यंत्रणेने अधिक सक्रिय भूमिका घ्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
कुलगुरू डॉ. विलास खर्चे म्हणाले, “विद्यापीठाची पुढील वाटचाल शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून करणार आहोत. शेतीवर परिणाम करणाऱ्या हवामान बदलावर मात करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर विद्यापीठाचा भर राहणार आहे.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी विद्यापीठाच्या अद्ययावत तंत्रज्ञानाचे दालन सुरू करण्यात येणार असून, फुले कृषी महोत्सवामध्ये विद्यापीठाच्या विविध प्रकल्पांवर आयोजित पीक प्रात्यक्षिकांना शेतकऱ्यांनी भेटी द्याव्यात.”
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते कृषीदर्शनी व दिनदर्शिका २०२६ या प्रकाशनांचे विमोचन करण्यात आले. तसेच ‘फुले कृषी वाहिनी ९०.८ एफ.एम.’ युट्युब चॅनल, ‘फुले अमृतकाळ’ व ‘फुले डेअरी ॲप’चे लोकार्पण करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाचे औचित्य साधून सौ. सविता नालकर व सौ. स्वाती शिंगाडे या प्रगतशील महिला शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन कृषीमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच, अखिल भारतीय समन्वित फळ संशोधन योजनेला उत्कृष्ट संशोधन प्रकल्पाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. भरत पाटील व योजनेच्या प्रमुख डॉ. सुमती दिघे, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचा आराखडा तयार करणारे आर्किटेक्ट रोहन मांडे यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दरम्यान, विद्यापीठ परिसरामधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी कृषीमंत्र्यांनी विद्यापीठाचे विविध तंत्रज्ञान व उत्पादने दर्शविणारे स्टॉल्स, महाबीज आणि कृषी विभागाच्या स्टॉल्सला तसेच भाजीपाला प्रकल्पाच्या थेट पीक प्रात्यक्षिकांना भेट देऊन पाहणी केली. कार्यक्रमास विविध भागांतील प्रगतशील शेतकरी, महिला शेतकरी, कृषी अधिकारी, विद्यार्थी व कृषी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





