कृषि विभागाच्या विविध पुरस्कारांसाठीऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
B1न्यूज मराठी नेटवर्क
परभणी, दि. 18 : महाराष्ट्र राज्य हे कृषि उत्पादन व कृषि उद्योग क्षेत्रात देशात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यातील शेती व पूरक क्षेत्रात उल्लेखनीय व अतुलनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसेच संस्थांचा दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत सन्मान करण्यात येतो.
यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार यांचा समावेश आहे. सदर पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात येतात.
यापूर्वी कृषी पुरस्कारांचे प्रस्ताव चार प्रतींमध्ये ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जात होते. या प्रक्रियेमुळे प्रस्ताव तयार करण्यासाठी खर्च येत असल्याने अनेक इच्छुक शेतकऱ्यांना अर्ज करणे शक्य होत नव्हते. तसेच प्रस्ताव सादरीकरण, पडताळणी व संकलन प्रक्रियेस अधिक कालावधी लागत होता.
या पार्श्वभूमीवर पुरस्कार प्रस्ताव प्रक्रिया अधिक सुलभ, वेळबद्ध, पारदर्शक व प्रभावी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. सदर ऑनलाईन प्रणाली कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://krishi.maharashtra.gov.in) ‘कृषी पुरस्कार’ या टॅबमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या संगणकीय प्रणालीद्वारे पुरस्कार प्रस्ताव सादरीकरण, तपासणी, मूल्यांकन तसेच अहवाल निर्मिती ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात राबविणे शक्य होणार आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शकता वाढणार असून पुरस्कार प्रक्रियेची कार्यक्षमता, विश्वासार्हता व परिणामकारकता अधिक बळकट होणार आहे.
शेतकऱ्यांना होणारे प्रमुख लाभ पुढीलप्रमाणे : ऑनलाईन प्रणालीमुळे घरबसल्या अर्ज सादर करण्याची सुविधा. चार प्रतींमधील ऑफलाईन प्रस्ताव तयार करण्याचा वेळ व खर्च वाचणार. एकदाच अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा सादर करण्याची आवश्यकता नाही. अर्जाची स्थिती (स्टेटस) सहजपणे ऑनलाईन पाहता येणार. छपाई, झेरॉक्स, प्रवास व पोस्ट खर्चात बचत होऊन आर्थिक भार कमी होणार.
आयुक्त (कृषी) यांनी सन 2025 पासूनच्या विविध कृषी पुरस्कारांसाठी इच्छुक शेतकरी, व्यक्ती, संस्था व गट यांनी ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी केले आहे.





