आचारसंहितेच्या कालावधीत 9 लक्ष 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बुलढाणा दि 29 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कालावधीत अवैध मद्यनिर्मिती, वाहतुक मोठ्या प्रमाणात होतात. अशा घटनाना प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत आचारसंहिता कालावधीत दि. 27 ऑक्टोंबरपर्यंत अवैध मद्यनिर्मिती व विक्री प्रकरणी 9 लक्ष 58 हजार 420 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. पराग मो. नवलकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यात कार्यरत विविध अनुज्ञप्त्यांच्या व्यवहारावर देखरेख तसेच नियंत्रणासाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वीत केली असून मध्यप्रदेश राज्याच्या सिमावर्ती भागात तपासणी नाके उभारण्यात आले आहे. तसेच नाक्यावर परराज्यातून येणाऱ्या अवैध मद्य वाहतुकीवर अंकुश ठेवण्यात येत आहे. यासाठी चार निरीक्षकांच्या नियंत्रणाखाली चार पथकांची नेमणुक केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत आचारसंहिता कालावधीत दि. 27 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये हातभट्टी व अवैध मद्यविक्रीच्या 47 ठिकाणी छापे टाकून 49 आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्यात ८ वाहने जप्त करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यात 9 लक्ष 58 हजार 420 रुपयांचे मुद्देमाल जप्त केलेला आहे. सदर कारवाई बुलढाणा जिल्ह्यातील मौजे बोराखेडी, पाडोळी, मातला, पैसोंडा, चौंडी, बोरी आडगाव, राजूर उमरखेड शिवार, कोलवड इत्यादी ठिकाणी करण्यात आली. या कारवाईत जिल्ह्यातील सर्व दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क व त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांचा सहभाग होता.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात “कोरडे दिवस” पाळण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे. त्यानुसार दि. 18 नोव्हेंबरचे सायंकाळी 5 वाजेपासुन ते 20 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद राहतील. तसेच दि. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी कोरडा दिवस जाहीर करण्यात आलेला आहे. मध्यप्रदेश राज्याच्या सिमावर्ती भागात सुद्धा कोरडा दिवस जाहीर करण्याबाबत बुरहानपुरचे(मध्यप्रदेश) जिल्हाधिकारी यांना पत्र देण्यात आले आहे.

बुलढाणा जिल्ह्यात रात्री गस्त घालुन खाजगी वाहने, ट्रॅव्हल्स इत्यादी मधुन अवैध मद्य वाहतुक होऊ नये याकरिता कसुन तपासणी करण्यात येत आहे. सिमावर्ती जिल्ह्याच्या मार्गावर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून मध्यप्रदेश अबकारी विभागासोबत संयुक्त मोहिम राबविण्यात येत आहे. अवैध मद्य विक्रेते, वाहतुक व विक्री करणाऱ्यावर तसेच हॉटेल्स, ढाब्यांची तपासणी करुन ढाबा चालक, मालकांसह त्याठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. अनियमीतता आढळून येणाऱ्या परवानाधारक मद्यविक्री दुकानदारांवरही कारवाई सुरु आहे. नागरीकांनी अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल्स ढाब्यावर जाऊन मद्य सेवन करु नये, असे आवाहन करण्यात येत आहे. अवैध मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल्स, ढाब्याबाबत, अवैध मद्यनिर्मीती वाहतुकीबाबत माहीती देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील टोल फ्री नंबर १८००२३३९९९९ किंवा व्हॉटसअॅप नंबर ८४२२००११३३ वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर तात्काळ माहिती द्यावी.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या