नगरपालिकानिवेदनबार्शीमहाराष्ट्र

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बार्शीकरांना दोन वर्षांची पाणीपट्टी व घनकचरा करमाफी द्या – माजी नगरसेवक रावसाहेब मनगिरे

B1न्यूज मराठी नेटवर्क350

बार्शी : राज्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरिकांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत बार्शी शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी सन २०२६-२७ आणि २०२७-२८ या दोन आर्थिक वर्षांतील निवासी पाणीपट्टी व घनकचरा कर माफ करावा, अशी मागणी बार्शी नगरपालिकेचे माजी नगरसेवक रावसाहेब बाबासाहेब मनगिरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी २५ नोव्हेंबर २०२६ रोजी नगरपालिका प्रशासनाला लेखी निवेदन सादर केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अत्यंत भयावह दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती निर्माण झाली. यामध्ये सोलापूर जिल्ह्यासह बार्शी तालुक्याचाही समावेश आहे. दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण भागाला मदत मिळण्यास सुरुवात झाली असली, तरी आगामी काळात जनावरांच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातील नागरिकांनाही दिलासा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.350बार्शी शहरातील नागरिकांनाही गेल्या काही काळापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना महिन्यातून केवळ तीन वेळा पाणी मिळत असल्याचे वास्तव निवेदनातून मांडण्यात आले आहे. शहरातील सर्वसामान्य कुटुंबांचे शिक्षण, आरोग्य, रोजीरोटी आणि दैनंदिन खर्च भागविताना आधीच आर्थिक ओढाताण होत आहे. त्यातच पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे अशा कठीण परिस्थितीत पालिकेने नागरिकांकडून पाणीपट्टी आणि घनकचरा कराची वसुली न करता त्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

वार्षिक २,५०० रुपये पाणीपट्टी आणि १०० रुपये घनकचरा कर माफ करण्याची मागणी

बार्शी नगरपालिकेकडून निवासी मालमत्ताधारकांकडून वार्षिक २ हजार ५०० रुपये पाणीपट्टी आणि १०० रुपये घनकचरा कर आकारला जातो. हे दोन्ही कर सन २०२६-२७ व २०२७-२८ या दोन आर्थिक वर्षांसाठी माफ करावेत. त्यामुळे प्रत्येक निवासी मालमत्ताधारकाला दोन वर्षांत एकूण ५ हजार २०० रुपयांचा आर्थिक दिलासा मिळू शकतो, असे निवेदनात म्हटले आहे. या निर्णयामुळे पालिकेच्या उत्पन्नावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता असली, तरी नागरिकांच्या अडचणींचा विचार करून हा निर्णय घ्यावा. नगरपालिकेने यासंदर्भात ठराव करून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.350नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावा बार्शी नगरपालिका सध्या सुमारे १०० कोटी रुपयांच्या कर्जाच्या विळख्यात असल्याची बाबही निवेदनात नमूद करण्यात आली आहे. पालिकेच्या आर्थिक अडचणी लक्षात घेता शासनाकडून १५ व्या वित्त आयोगातून तसेच नागरी सेवा व सुविधा अनुदानाच्या माध्यमातून मदत मिळत असते. जिल्हा नगरोत्थान योजनेसाठी पालिकेचा हिस्सा भरण्यासाठी शासन मदत करते. त्यामुळे नागरिकांना दोन वर्षांची करसवलत देण्यासाठीही शासनाकडे पाठपुरावा करावा, असे त्यांनी सुचविले आहे. तसेच दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळात नगरपालिका कायद्यातील तरतुदींनुसार योग्य तो निर्णय घेण्याचा अधिकार नगरपरिषदेला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.350विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्याची मागणी राज्यातील काही नगरपालिकांनी यापूर्वी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीपट्टी माफ करण्यासंदर्भात ठराव मंजूर केले असल्याचा दाखलाही रावसाहेब मनगिरे यांनी दिला आहे. बार्शी नगरपालिकेनेही अशाच प्रकारे पुढाकार घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा.

यासाठी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी. सभागृहासमोर हा विषय मांडून संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार ठराव मंजूर करावा आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आर्थिक संकट, पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करणाऱ्या बार्शीकरांना दोन वर्षांची पाणीपट्टी व घनकचरा करमाफी मिळणार का, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.350

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button