पीएम-यशस्वी शिष्यवृत्तीसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा, इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागास व विमुक्त-भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांना आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क
जालना,दि.25 : केंद्र शासनाच्या पीएम -यशस्वी योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी टॉप क्लास एज्युकेशन इन स्कूल आणि टॉप क्लास एज्युकेशन इन कॉलेज या शिष्यवृत्ती योजनांचे नवीन व नूतनीकरणाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी तात्काळ अर्ज भरावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक अनंत कदम यांनी केले आहे.
या योजनांसाठी पात्र विद्यार्थ्यांनी दि. 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत. अर्ज भरणे आणि पडताळणीसाठी शासनाने वेळापत्रक निश्चित केले असून, विद्यार्थ्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. दि. 15 डिसेंबरपर्यंत अर्ज पडताळणी होणार असून, शैक्षणिक संस्थांच्या पडताळणीची अंतिम तारीख 15 डिसेंबर तर त्यापुढील स्तरावरील पडताळणी दि. 31 डिसेंबरपर्यंत करावी लागणार आहे. सर्व पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल(एनएसपी)वर अर्ज पूर्ण करावेत. तसेच संबंधित शैक्षणिक संस्थांनीही योजनांच्या नियमांचे पालन करून अर्जांची पडताळणी निर्धारित वेळेत पूर्ण करावी. विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक अनंत कदम यांनी केले आहे.




