जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमक; दोघांची दक्षिण कोरियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

लोणीकंदच्या श्रीराज शिंदे व आरोही उजगरे नोव्हेंबरअखेर सोलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार; ग्रामीण विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञान कौशल्याला नवी झेप
B1न्यूज मराठी नेटवर्क
पुणे : जिल्हा परिषद पुणे शाळांमधील विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स, कोडिंग, नवकल्पना आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर पुणे जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे. रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिप २०२६ मध्ये जिल्ह्यातील २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. करेगाव आणि लोणीकंद जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारांत अव्वल स्थान पटकावले असून, लोणीकंद शाळेतील दोन विद्यार्थ्यांची दक्षिण कोरियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
करेगाव जिल्हा परिषद शाळेत फियाटच्या सहकार्याने ५६ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. त्यापैकी सहा विद्यार्थ्यांच्या दोन संघांनी टॉप १० मध्ये स्थान मिळविले, तर तीन विद्यार्थ्यांच्या एका संघाने टॉप ३ मध्ये स्थान पटकावले. लोणीकंद जिल्हा परिषद शाळेत झेडएस असोसिएट्सच्या सहकार्याने १५८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. येथील १० विद्यार्थ्यांच्या दोन संघांनी टॉप १० मध्ये स्थान मिळविले. उद्योजकता आव्हान (Entrepreneurship Challenge) आणि फोक रेस (Folk Race) या प्रकारांत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले.
लोणीकंदच्या दोघांची दक्षिण कोरियासाठी निवड लोणीकंद जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता सहावीतील श्रीराज अभिजित शिंदे आणि इयत्ता सातवीतील आरोही रामचंद्र उजगरे यांची रोबोटेक्स इंटरनॅशनल चॅम्पियनशिप २०२६ साठी निवड झाली आहे. ही स्पर्धा २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी दक्षिण कोरियातील सोल येथे होणार असून, दोघे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
विद्यार्थ्यांनी ‘स्कोव्हेरा’ (Schovera) हा उद्योजकता आव्हानातील प्रकल्प विकसित केला आहे. शाळेसाठी तयार केलेले हे बहुभाषिक ॲप इंटरनेटशिवाय कार्य करू शकते. त्याद्वारे उपस्थिती, विद्यार्थी सुरक्षा, शैक्षणिक माहिती आणि पालक-शिक्षक संवाद सुलभ करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. याशिवाय फोक रेस आणि गर्ल्स फायर फायटिंग या रोबोटिक्स स्पर्धांमध्येही ते सहभागी होणार आहेत.
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञान शिक्षणाला बळ जिल्हा परिषद, शैक्षणिक संस्था आणि कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) भागीदारीमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, कोडिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि एसटीईएम शिक्षणाची संधी मिळत आहे. झेडएस असोसिएट्स आणि फियाट यांच्या सहकार्यामुळे शाळांमध्ये तंत्रज्ञानाधारित शिक्षणाला चालना मिळाली आहे.
रोबोटेक्स इंडिया (एज्युकेट टू एलिव्हेट ट्रस्ट) ही संस्था सरकारी व निमशहरी शाळांमधील विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, कोडिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि एसटीईएम शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जाते.
मान्यवरांनी केले अभिनंदन जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, पायाभूत सुविधा आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवू शकतात, असे सांगितले. रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि एसटीईएम शिक्षणामुळे विद्यार्थ्यांसाठी नव्या संधी निर्माण होत असून जिल्हा परिषद शाळांमध्ये अशा संधी वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांना शहरी विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षण आणि अनुभवाच्या समान संधी उपलब्ध करून देणे हे जिल्हा परिषदेचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. तंत्रज्ञानाधारित शिक्षणातून विद्यार्थ्यांची नवकल्पना, सर्जनशीलता आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष विरधवल जगदाळे यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी अभिमानास्पद असल्याचे सांगत विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि सहकार्य करणाऱ्या संस्थांचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळत असल्याचे अधोरेखित करणारी ही कामगिरी पुणे जिल्ह्यात तंत्रज्ञानाधारित शिक्षणाच्या विस्तारासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.




