11 एप्रिलला ‘जागर’मध्ये डॉ, नरेंद्र जाधव उलगडविणार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुआयामी व्यक्तित्वाचे विविध पैलू
B1न्यूज मराठी नेटवर्क
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये ‘जागर 2023’ या व्याख्यानमालेमध्ये होत असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या व्याख्यानांना प्रचंड प्रतिसाद लाभताना दिसत आहे. यामध्ये आता मंगळवार, दि. 11 एप्रिल 2023 रोजी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, विचारवंत, साहित्यिक डॉ. नरेंद्र जाधव यांच्यासारखे अत्यंत विद्वान आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व आपले व्याख्यानपुष्प गुंफणार आहे.
11 एप्रिल हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्यांना गुरूस्थानी मानायचे असे थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांचा जयंतीदिन असून डॉ. नरेंद्र जाधव यादिवशी ‘विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर : बहुआयामी व्यक्तिमत्व’ या विषयावर श्रोत्यांशी सुसंवाद साधत बाबासाहेबांच्या आभाळाएवढ्या व्यक्तिमत्वातील विविध पैलूंचे दर्शन घडविणार आहेत. ‘आमचा बाप आणि आम्ही’ या वीसहून अधिक भाषांमध्ये प्रकाशित व दोनशेहून अधिक आवृत्त्या प्रसिध्द झालेल्या इतिहास घडविणा-या रेकॉर्डब्रेक पुस्तकाचे लेखक म्हणून सर्वसामान्य वाचकालाही सुपरिचित असणारे डॉ. नरेंद्र जाधव सावित्रीबाई विद्यापीठ पुणेचे माजी कुलगुरू आहेत. साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ याप्रमाणेच ते जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ असून रिझर्व्ह बॅंकेचे मुख्य आर्थिक सल्लागार पद भूषविणारे डॉ. नरेंद्र जाधव यांनी नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटविलेला आहे.
राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य म्हणून त्यांची संसदीय कारकिर्द अभ्यासू सूचनांमुळे लक्षवेधी ठरली. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील त्यांची 41 पुस्तके प्रसिध्द असून त्यामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर 21 पुस्तके प्रसिध्द आहेत. अशा नामांकित, अभ्यासू वक्त्याकडून बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलू उलगडले जात असताना प्रत्यक्ष ऐकणे ही अतिशय मोठी आनंदपर्वणी ठरावी.
म्हणूनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव विविध व्याख्यानांतून वैचारिक जागराव्दारे सादर होत असताना दि. 11 एप्रिल 2023 रोजी महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीदिनी, डॉ. नरेंद्र जाधव यांच्यासारख्या अत्यंत महत्वाच्या आंतरराष्ट्रीय वक्त्याने सांगितलेले बाबासाहेबांबद्दलचे विचारधन ऐकण्यासाठी मोठ्या संख्यने उपस्थित रहावे असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.