मालवंडी ग्रामपंचायत गाळे फेरलिलावाची मागणी , ग्रामपंचायत कर वसुली नसल्याने कामगारांचे पगार थकले
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यातील मालवंडी ग्रामपंचायतीचे १९ गाळे भाडेतत्त्वावर दिले असून संबंधित भाडेकरूंनी वेळेत भाडे न भरल्याने एकूण थकबाकी जवळपास पंधरा लाखांच्या आसपास जात आहे. शासनाच्या नियमानुसार गाळेधारकांना पोट भाडेकरू ठेवता येत नाही परंतु अनेक गाळेधारकांनी पोटभाडेकरू ठेवले आहेत. हे गाळेधारक पोटभाडेकरू कडून दोन ते पाच हजार रूपये भाडे घेतात, मात्र ग्रामपंचायत कर वेळेवर भरत नाहीत. ग्रामपंचायतने व्यावसाय करण्यासाठी गाळे भाड्याने दिले आहेत. मात्र संबंधित भाडेकरू पोटभाडेकरू ठेवून पैसे कमवू लागेल आहेत. हे शासनाच्या नियमात बसत नसल्याने गावातील सामाजिक कार्यकर्ते धनाजी राजगुरू यांनी ग्रामसेवक, सरपंच यांच्याकडे या गाळ्यांचा फेरलिलाव करावा अशी मागणी पत्र एक वर्षापूर्वी देऊन देखील कार्यावही झालेली नाही. यासह गावामध्ये अनेक लहान मोठे व्यावसाय सुरू आहेत त्यांचा देखील कर थकीत आहे. कर वसुल करणे आणि कामगारांचा पगार वेळेवर देणे हे प्रशासनाचे काम असते परंतु प्रशासन निष्काळजीपणा करत असल्याचे दिसून येते. ग्रामपंचायतची कामे वेळेवर होत नसतील तर प्रशासन काय कामाचे? असा प्रश्न गावातील नागरिक करीत आहेत.वेळेवर पगार होत नसल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी घर कसे चालवायचे असा प्रश्न संबंधित कुटुंबांना पडला आहे.
पंधरा वर्षे झाली ग्रामपंचायत मध्ये काम करतो आहे. मात्र मागील पाच वर्षांत एकदाही वेळेत पगार झाला नाही. पीएफ देखील जमा केला नाही. पगार वेळेवर मिळत नसल्याने महागाई भत्ता देखील मागणं मुश्कील झालं आहे. गावांसाठी काम करायचं पगार वेळेवर मिळत नसेल तर कुटुंब कसे चालवायचे?
– प्रकाश विभूते, पाणीपुरवठा कर्मचारी ग्रामपंचायत मालवंडी
ग्रामपंचायत उत्पन्न वाढीसाठी गाळे ११ महिन्याच्या कराराने भाडेतत्त्वावर दिले जातात. भाडे थकीत असेल तर संबंधितांना नोटीस देऊन गाळा सीलबंद करायला हवा. शासनाच्या नियमानुसार पोटभाडेकरू ठेवता येत नाहीत. पोटभाडेकरू ठेवले असतील तर कायदेशीर कारवाई करायला हवी. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळत नसेल तर ही बाब अतिशय गंभीर असून संबंधित ग्रामसेवकाला बोलवून माहिती घेतली जाईल.