बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमध्ये मोत्यांच्या दागिने निर्मितीच्या पाच दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन
विद्यार्थिनींकडून अनाथाश्रमातील मुलांसाठी राख्यांची निर्मिती
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी येथे अंतर्गत तक्रार निवारण समिती व कौशल्य विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींसाठी आयोजित पाच दिवसीय मोत्यांचे दागिने व राख्या बनविण्याच्या कार्यशाळेचे उद्घाटन २७ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
कार्यशाळेच्या उद्घाटक म्हणून ॲडव्होकेट प्रणाली शेटे उपस्थित होत्या, तर प्रमुख पाहुण्या व प्रशिक्षक म्हणून सौ. राजश्री जायभाय यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. कदम होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कार्यशाळेच्या समन्वयक व ग्रंथपाल ज्योती यादव यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक विद्यार्थिनीने शैक्षणिक ज्ञानाबरोबरच एखादे स्वतंत्र व उपयुक्त कौशल्य आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. अशा कार्यशाळांमुळे विद्यार्थिनींना स्वावलंबनाची दिशा मिळून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
उद्घाटक ॲडव्होकेट प्रणाली शेटे यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थिनींनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी ज्ञानासोबत कौशल्य, आत्मविश्वास आणि स्वावलंबन आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी प्रमुख प्रशिक्षक सौ. राजश्री जायभाय यांनी विद्यार्थिनींना मोत्यांपासून दोन प्रकारच्या आकर्षक व सुंदर राख्या तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे या प्रशिक्षणात सहभाग घेत विविध आकर्षक राख्यांची निर्मिती केली.
या कार्यशाळेचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थिनींनी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या राख्या श्री गुरुदेव दत्त बहुउद्देशीय अनाथ मुलामुलींची वारकरी संस्था, शेलगाव चौक, बार्शी येथील आश्रमातील मुलांना बांधण्यात येणार आहेत. या उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये सामाजिक बांधिलकी, संवेदनशीलता, आपुलकी आणि सेवाभावाची जाणीव अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. ए. बी. कदम यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना दोन महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी संपादन करणे पुरेसे नाही; प्रत्येक विद्यार्थिनीने एखादे उपयुक्त हस्तकौशल्य आत्मसात करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा कौशल्याधारित उपक्रमांमुळे विद्यार्थिनींच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळतो, त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रूपाली शिंदे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. प्रेमा दळवी यांनी करून दिला, तर प्रा. नंदा तुपे यांनी आभार प्रदर्शन केले. या पाच दिवसीय कार्यशाळेमुळे विद्यार्थिनींना मोत्यांचे दागिने व आकर्षक राख्या बनविण्याचे कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळणार असून, हा उपक्रम त्यांच्या स्वावलंबनाबरोबरच सामाजिक जाणीवा विकसित करणारा उपक्रम ठरणार आहे.





