गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी, घरफोडी, जबरी चोरीचे ५ गुन्हे उघड; १८ लाखांचा मुद्देमाल व गांजा जप्त
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : सोलापूर शहर गुन्हे शाखेने शहरात विविध ठिकाणी घडलेल्या मालाविषयक गुन्ह्यांविरुद्ध धडक मोहीम राबवून घरफोडीचे २, जबरी चोरीचे २ आणि मोटारसायकल चोरीचा १ असे एकूण ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत तब्बल १६ लाख ९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, दुसऱ्या एका कारवाईत दोन किलोहून अधिक गांजा जप्त करत १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांनी ही धडक कारवाई केली.
सुमारे २०० किलोमीटर व १६८ सीसीटीव्हींची पडताळणी, तांत्रिक विश्लेषण अन् सलग ०८ दिवस सातत्यपूर्ण तपास
रात्रीच्या वेळी सोनसाखळी चोरी झाल्यानंतर व घटनास्थळी कुठे CCTV फुटेज मिळत नसल्याने आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासून तपास करणे गरजेचे होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. शैलेश खेडकर यांच्या पथकातील इम्रान जमादार यांनी घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातील असलेले सीसीटीव्ही फुटेज विश्लेषण करून सदरचा गुन्हा हा कोणत्या संशयित आरोपींनी केला आहे, हे अचूकपणे शोधून काढले.
त्यानंतर स.पो.नि. शैलेश खेडकर यांच्या पथकातील इम्रान जमादार, उमेश पवार, विनोद रजपूत, रामा भिंगारे आणि सुरज पवार या पथकाने सुमारे २०० किलोमीटर दूर जात, आरोपीच्या येण्या-जाण्याच्या मार्गावरील १६८ CCTV कॅमेरांची सलग ०८ दिवस सातत्यपूर्ण पडताळणी केली. त्याअनुषंगाने तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर गोपनीय माहिती काढून आरोपींना परभणी येथून जेरबंद करण्यात यश आले आहे. आरोपींकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली २५ ग्रॅमची सोन्याची चैन, गुन्ह्यात वापरलेले मोबाईल आणि मोटरसायकल असा एकूण २,७५,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. एवढ्या दूरपर्यंत CCTV कॅमेरे पडताळणी करून गुन्हे शाखेस तपासाचा एक वेगळा व आव्हानात्मक अनुभव आला.
इतर प्रमुख कारवाया
पुण्यातील सराईत घरफोड्या जेरबंद; १२.८९ लाखांचे दागिने जप्त:
पुणे ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार यश ऊर्फ सोन्या ज्ञानेश्वर खलसे (वय २२, रा. पुणे) हा सोलापुरात येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळताच स.पो.नि. निलेश पाटील-सोनवणे यांच्या पथकाने त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून जेलरोड पोलीस ठाण्यातील घरफोडीचे २ गुन्हे आणि सासवड (पुणे ग्रामीण) येथील मोटारसायकल चोरीचा १ गुन्हा उघडकीस आला. त्याच्याकडून ८१ ग्रॅम सोन्याचे व १० ग्रॅम चांदीचे दागिने तसेच युनिकॉर्न मोटारसायकल असा एकूण १२ लाख ८९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दीड वर्षांपूर्वी महिलेचे मंगळसूत्र लुटणारे आंतरजिल्हा गुन्हेगार गजाआड
जानेवारी २०२५ मध्ये सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीत किराणा दुकानासमोर उभ्या असलेल्या महिलेचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जबरदस्तीने हिसकावून त्यातील दोन वाट्या पळवून नेल्या होत्या. गुन्हे शाखेचे स.पो.नि. शंकर धायगुडे व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू ठेवला होता. सतत ठावठिकाणा बदलणारे सराईत आरोपी अजय संजय पंडीत (वय २१) व राहुल माणिक आमराव (वय ३०, दोघे रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) यांना १० सप्टेंबर रोजी शिताफीने पकडण्यात आले. त्यांच्याकडून ४५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन वाट्या जप्त करण्यात आल्या.
या दोघांवर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, करमाळा आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
दोन किलो गांजासह एकाला अटक; १.९० लाखांचा मुद्देमाल जप्त:
नवीवेस ते रेल्वे स्टेशन मार्गावर जुनी मिल चाळ परिसरात गस्त घालत असताना पो.उप.नि. विजय बनसुडे व त्यांच्या पथकाने संशयास्पद वेगाने जाणाऱ्या ॲक्सेस स्कूटीचा पाठलाग केला. या कारवाईत शिवाजी धनु राठोड (वय ६०, रा. बक्षी हिप्परगा, सोलापूर) यास ताब्यात घेण्यात आले, तर त्याचा साथीदार संतोष राम चव्हाण हा पळून जाण्यात यशस्वी झाला. स्कूटीवर अडकवलेल्या पिशवीची फॉरेन्सिक तपासणी केली असता त्यामध्ये २ किलो ११ ग्रॅम गांजा मिळून आला. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून स्कूटी व गांजा असा १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कामगिरी करणारे पथक
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. निलेश पाटील-सोनवणे, स.पो.नि. शैलेश खेडकर, स.पो.नि. शंकर धायगुडे, पो.उप.नि. विजय बनसुडे यांच्यासह अंमलदार विजय वाळके, तात्यासाहेब पाटील, गणेश शिंदे, अभिजित पवार, विनोद रजपूत, इम्रान जमादार, उमेश पवार, रामा भिंगारे, सुरज पवार, वसिम शेख, वाजीद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, शंकर याळगी, शैलेश बुगड, राजकुमार वाघमारे, अजिंक्य माने, अभिजित धायगुडे, काशिनाथ वाघे, सायबरचे प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, आशिष राठोड व चालक बाळासाहेब काळे, खंडू कांबळे यांनी केली.




