आरोग्यमहाराष्ट्रमुंबई

राज्यातील १४ हजार ७४७ कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दहा वर्षांहून अधिक सेवा देणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदांना शासनाची मान्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या पुढाकारातून महत्त्वपूर्ण शासन निर्णय

B1न्यूज मराठी नेटवर्क500

मुंबई, दि. २७ ऑक्टोबर २०२६ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात अनेक वर्षांपासून आरोग्यसेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कंत्राटी सेवा पूर्ण केलेल्या १४ हजार ७४७ पात्र कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करून त्यावर नियुक्ती देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय २७ ऑक्टोबर २०२६ रोजी निर्गमित केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला आहे.

दीर्घकाळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण, दुर्गम आणि शहरी भागांमध्ये आरोग्यसेवा पोहोचविण्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. माता-बाल आरोग्य, लसीकरण, संसर्गजन्य रोग नियंत्रण, विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आणि जनजागृती उपक्रमांच्या अंमलबजावणीत हे कर्मचारी अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत.500या कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन सेवेची दखल घेऊन पात्र कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक व्यवस्थेला महत्त्वपूर्ण आधार मिळणार आहे.

१४ हजार ७४७ पात्र कर्मचाऱ्यांसाठी विशेष तरतूद

दिनांक २५ जून २०२६ रोजी तांत्रिक खंड वगळून दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कंत्राटी सेवा पूर्ण केलेल्या १४ हजार ७४७ पात्र कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करून त्यावर नियुक्ती देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

हा निर्णय एकवेळची विशेष बाब म्हणून घेण्यात आला असून, संबंधित कर्मचाऱ्यांची नियुक्ती शासन निर्णयातील अटी व शर्तींच्या अधीन राहून करण्यात येणार आहे.

वेतन आणि सेवाशर्तींबाबत तरतुदी

शासन निर्णयानुसार, अधिसंख्य पदांवर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबंधित पदासाठी निश्चित केलेल्या वेतनश्रेणीचा लाभ मिळणार आहे. त्यांना मूळ वेतनाव्यतिरिक्त महागाई भत्ता आणि प्रवास भत्ता लागू राहील. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सध्या अनुज्ञेय असलेल्या रजा लागू राहतील.

मात्र, या अधिसंख्य पदांवरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना तसेच सेवानिवृत्ती व कुटुंब निवृत्तीवेतन योजना लागू राहणार नाहीत. या नियुक्त्या शासन निर्णयातील संबंधित अटी व शर्तींनुसार राहतील.

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला मिळणार बळ

राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी अनुभवी मनुष्यबळाचे योगदान महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अनेक वर्षे सेवा देणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे त्यांच्या सेवेला विशेष मान्यता मिळाली आहे.

प्राथमिक आरोग्य सेवा, ग्रामीण आरोग्य व्यवस्था आणि विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी या कर्मचाऱ्यांचा अनुभव आणि योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

शासन निर्णयानुसार पुढील कार्यवाही

संबंधित पात्र कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची पुढील कार्यवाही शासन निर्णयात नमूद केलेल्या अटी व शर्तींनुसार करण्यात येणार आहे. या निर्णयानुसार निर्माण करण्यात आलेली अधिसंख्य पदे २५ जून २०२६ पासून अस्तित्वात येतील.

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन सेवेची दखल घेणारा हा निर्णय त्यांच्या सेवाविषयक व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. “राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १४ हजार ७८७ अधिसंख्य पदे निर्माण करून पात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे दीर्घकाळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असून, राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण व लोकाभिमुख होण्यास मदत होईल.”

— प्रकाश आबिटकर
मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य
500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button