बार्शीत दोन दिवसीय शास्त्रीय संगीत शिबिर उत्साहात संपन्न

पं. किरण फाटक व विवेक वडगबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीतप्रेमींना शास्त्रीय संगीताचे धडे
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शंकरा संगीत विद्यालय, बार्शी येथे २४ व २५ ऑक्टोबर २०२६ रोजी दोन दिवसीय शास्त्रीय संगीत विषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पं. किरण फाटक (संगीत अलंकार), श्री विवेक वडगबाळकर (संगीत विशारद) तसेच संगीत पुस्तकाचे प्रकाशन करणारे कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनामुळे शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताच्या विविध पैलूंची माहिती देण्यात आली. रागांची ओळख, स्वररचनाशास्त्र, रागांचे वर्गीकरण, गमक व तानांचे प्रकार, ख्याल गायकी, स्वरलेखन तसेच संगीत साधनेसाठी योग व प्राणायाम यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच संगीताच्या विविध प्रकारांचा अभ्यास आणि सादरीकरणाची माहितीही देण्यात आली.
बार्शी शहरातील संगीतप्रेमी, विद्यार्थी आणि शिक्षकांनी या शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. दोन दिवस चाललेल्या या शिबिरातून सहभागी विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताचे सखोल ज्ञान मिळवण्याची संधी उपलब्ध झाली.
शंकर वाघमारे, शंकरा संगीत विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे शिबिर उत्साही वातावरणात संपन्न झाले. शास्त्रीय संगीताची आवड जोपासणे, नवोदित विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळवून देणे आणि संगीताची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.




