‘आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेच्या अंकाचेराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते प्रकाशन

B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई, दि. २७ : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या सप्टेंबर २०२६ या अंकाचे प्रकाशन शालेय शिक्षण राज्यमंत्री तथा अतिथी संपादक डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) गोविंद अहंकारी, माहिती व जनसंपर्क विभागाचे अवर सचिव अजय भोसले, प्र.उपसंचालक तथा वरिष्ठ सहायक संचालक (प्रकाशने) जगदीश मोरे, विभागीय संपर्क अधिकारी निलेश तायडे उपस्थित होते.
‘आपलं मंत्रालय’च्या या अंकामध्ये शालेय शिक्षणातील प्रयोगशील उपक्रम, ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’, विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थ्यांचे यश, तसेच केंब्रिज विद्यापीठाशी संबंधित शैक्षणिक सहकार्य आणि ‘क्लायमेट क्वेस्ट’ या उपक्रमाची माहिती देण्यात आली आहे.
तंत्रज्ञानविषयक लेखांमध्ये स्मार्टफोनमधील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल डिटॉक्स या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय ‘कुमारजी : स्वरांपलीकडचा अंतर्मनाचा शोध’, ‘मनडोहातील अनंततरंग’, ‘गामक घर’ यासारख्या साहित्य-सांस्कृतिक लेखांमधून संगीत, कुटुंबव्यवस्था आणि मानवी भावविश्वाचा वेध घेण्यात आला आहे.
योजनांची माहिती, शैक्षणिक प्रयोग, सांस्कृतिक वारशाचे जतन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर या विविध विषयांचा समावेश असलेला हा अंक वाचकांना शासनाच्या उपक्रमांची तसेच महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक वाटचालीची माहिती देणारा आहे. मंत्रालयातील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे, या उद्देशाने गृहपत्रिका प्रकाशनाचा उपक्रम राबविण्यात येत आहे.




