स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी; अक्कलकोट बसस्थानकावरील दागिने चोरी करणाऱ्या दोन महिला जेरबंद
B1 न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : अक्कलकोट बसस्थानकावर भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या दोन महिलांना स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणच्या पथकाने अटक करून त्यांच्या ताब्यातून १५ ग्रॅम ४७० मिली वजनाचे सोन्याचे दोन मंगळसूत्र जप्त केले आहेत. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ₹२,२७,२०० इतकी आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याची मोहीम सुरू असून, त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी तपास पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या. अक्कलकोट बसस्थानकावर भाविकांचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेण्याचे आदेशही देण्यात आले होते.
१ सप्टेंबर २०२६ रोजी कुंभारी टोलनाक्यावर पेट्रोलिंग दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, अक्कलकोट बसस्थानकावर चोरी करणाऱ्या दोन महिला कुंभारी बसस्थानकावर येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोन्ही संशयित महिलांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान महिलांनी जुलै व ऑगस्ट २०२६ महिन्यात अक्कलकोट बसस्थानकावर चोरी केल्याची कबुली दिली. तपासात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दाखल दोन गुन्ह्यांची उकल झाली.
जप्त मुद्देमाल
- १० ग्रॅम ४५० मिली वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र – किंमत ₹१,५२,०००
- ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र – किंमत ₹७५,२००
एकूण जप्त मुद्देमाल : ₹२,२७,२००
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.




