गणपती महोत्सव २०२६ : गणेशमूर्ती विक्री स्टॉलचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते उद्घाटन
B1न्यूज मराठी नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर, दि. १३ : ‘उमेद’ अभियानांतर्गत ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांनी तयार केलेल्या गणेशमूर्ती विक्री स्टॉलचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते आज करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल, समाज कल्याण सभापती बालाजी सोनटक्के आणि जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या वतीने ‘गणपती महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या मैदानावर हे विक्री स्टॉल उभारण्यात आले आहेत.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, “गतवर्षी जिल्ह्यात बचत गटांच्या माध्यमातून गणेशमूर्तींच्या विक्रीतून ६.९३ कोटी रुपयांची उलाढाल झाली. ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी जिल्हास्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून ‘उमेद मॉल’साठी २० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तसेच, महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणावर कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.”
“यासोबतच, माननीय पंतप्रधान आणि माननीय मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेनुसार, स्वयंसहायता समूहांमध्ये सहभागी असलेल्या महिलांना ‘लखपती दीदी’ बनविण्यासाठी उमेद अभियानाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत २१ हजार ५२८ समूह स्थापन झाले आहेत. यामध्ये ९४२ ग्राम संघ आणि ६१ प्रभाग संघ स्थापन झाले असून, हे संघ सध्या कार्यरत आहेत. तसेच, उमेद अभियानातील महिलांना विपणनासाठी छत्रपती संभाजीनगर विमानतळ आणि रोटेगाव रेल्वे स्थानकावर स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत,” असेही सोळंके यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला माजी महापौर तथा नगरसेवक त्र्यंबक तुपे, माजी महापौर नंदू घोडेले, रवी पटवर्धन, जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सरगर, जिल्हा मार्केटिंग व्यवस्थापक सचिन सोनवणे, जिल्हा व्यवस्थापक सुचिता खोतकर, प्रज्ञा दाभाडे, बिभीषण भोईटे यांच्यासह तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक, समुदाय कृषी व्यवस्थापक, समुदाय पशु व्यवस्थापक, जिल्ह्यातील स्वयंसहायता समूहातील महिला आणि जिल्हा परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सरगर यांनी केले.




