भौतिक सीमारेषांच्या पलीकडे जाऊन अंतर्मनातील स्नेह जागविण्याची आज खरी गरज : संगीता दीदी
रक्षाबंधन स्नेहमिलनात संगीता दीदींचे प्रतिपादन; बार्शीतील पत्रकार बंधू-भगिनींसाठी विशेष रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : भौतिक अपेक्षांच्या पलीकडे जाऊन अंतर्मनातील स्नेह, पवित्रता आणि आत्मीयता जागृत करण्याची आज खरी गरज आहे. विश्वातील प्रत्येक नारी ही माझी बहीण आहे, या व्यापक दृष्टिकोनातून रक्षाबंधनाचा आध्यात्मिक अर्थ समजून घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ब्रह्माकुमारीज बार्शी सेवाकेंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी संगीता दीदी यांनी केले.
बार्शी येथील ब्रह्माकुमारीज राजयोग भवन, ओम शांती कॉलनी, पाटील प्लॉट येथे पत्रकार बंधू-भगिनींसाठी विशेष रक्षाबंधन स्नेहमिलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकार बंधू-भगिनींसह बार्शीतील विविध क्षेत्रांतील नागरिकांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्रह्माकुमारीज बार्शी सेवाकेंद्राचे केअरटेकर मोहनभाई यांनी केले. ते म्हणाले, “प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय हे कोणत्याही धर्म, जात किंवा पंथाशी संबंधित नसून, परमात्म्याशी संबंध जोडण्याची सहज विधी म्हणजे राजयोग शिकविणारे विद्यालय आहे.”
सन १९३६ मध्ये निराकार परमात्म्याने प्रजापिता ब्रह्माबाबांना साकार माध्यम बनवून या ईश्वरीय कार्याची स्थापना केली. या कार्याचे स्वरूप समाजाला सुरुवातीला समजू न शकल्यामुळे संस्थेला मोठ्या प्रमाणावर विरोधाचा सामना करावा लागला. त्या काळात प्रसारमाध्यमांमधूनही काही चुकीच्या व कल्पित बातम्या प्रसारित झाल्या. मात्र, कालांतराने याच प्रसारमाध्यमांनी ब्रह्माकुमारीजचे कार्य ईश्वरीय कार्य म्हणून समाजापर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असे मोहनभाईंनी सांगितले.
आज स्थानिक गावपातळीपासून राष्ट्रीय स्तरापर्यंतचे पत्रकार व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी ब्रह्माकुमारीजच्या आबूराज व आबूरोड येथील मुख्यालयाला भेट देतात, विविध संमेलनांमध्ये सहभागी होतात आणि या ईश्वरीय कार्याची माहिती समाजापर्यंत पोहोचवितात. बार्शीतील पत्रकार बंधू-भगिनींनी गेल्या अनेक वर्षांपासून ब्रह्माकुमारीज संस्थेशी अत्यंत स्नेहपूर्ण व आत्मीय संबंध जोपासले आहेत. “गेल्या चाळीस वर्षांच्या सेवाकाळात पत्रकार बंधू-भगिनींना भेटताना मला पारिवारिक नात्याची जवळीक अनुभवायला मिळाली,” असा स्वानुभवही मोहनभाईंनी व्यक्त केला.
रक्षाबंधन म्हणजे पवित्रता व स्नेहाचा संदेश रक्षाबंधन हा भारतीय संस्कृती-परंपरेतील पवित्रता, स्नेह आणि बंधुभावाचा संदेश देणारा सण आहे. मात्र, आजच्या काळात या उत्सवामध्ये काही प्रमाणात भौतिकतेचा शिरकाव झाला आहे. पूर्वी साध्या धाग्याची राखी बांधली जात असे; आज अधिक आकर्षक व किमतीच्या राख्या खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. पूर्वी ओवाळणीमध्ये भावाने दिलेल्या छोट्याशा वस्तूमध्येही बहिणीला आभाळाएवढे समाधान मिळत असे; मात्र आज काही ठिकाणी अधिक किमतीच्या वस्तूंची अपेक्षा केली जाते, असे संगीता दीदी यांनी सांगितले.
“भौतिक सीमारेषांच्या पलीकडे जाऊन अंतर्मनातील स्नेह जागविण्याची आज खरी गरज आहे,” असे सांगत त्यांनी रक्षाबंधनाचा आध्यात्मिक अर्थ स्पष्ट केला. त्या पुढे म्हणाल्या, “लहान भाऊ किंवा परगावी, परदेशी असलेला भाऊ बहिणीच्या संकटाच्या वेळी प्रत्यक्ष मदतीला पोहोचेलच असे नाही; मात्र परमात्मा प्रत्येक क्षणी मदतीला पोहोचू शकतो. ‘त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव’ या भावनेने परमात्म्याशी सर्व नाती जोडली, तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर ईश्वरीय मदतीची अनुभूती घेता येते.”
परमात्म्याशी सर्व संबंध जोडण्याची सहज साधना म्हणजे राजयोग, असेही त्यांनी स्पष्ट केले. निर्देशित ध्यानातून शांततेची अनुभूती कार्यक्रमात ब्रह्माकुमारी डॉ. प्रणोती कोकाटे यांनी करवून घेतलेल्या निर्देशित ध्यानातून उपस्थितांना शांततेचा अनुभव मिळाला. ब्र.कु. मीरा दीदी यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. यावेळी महादेवी दीदी व निशा दीदी यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमापूर्वी पत्रकार बंधू-भगिनींनी ‘ईश्वर पित्याला पत्र’ लिहून ते योगकक्षातील ‘भगवान को खत’ या विशेष पत्रपेटीत टाकले. त्यानंतर तेथे ठेवलेल्या लिफाफ्यांमधून प्रत्येकाने एक लिफाफा घेतला. त्यामध्ये परमात्म्याने उत्तर दिल्याचा भावपूर्ण संदेश होता. आपण ईश्वराला लिहिलेल्या पत्राला समर्पक उत्तर मिळाल्याचा आध्यात्मिक अनुभव उपस्थितांना आला. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उपस्थित सर्व पत्रकार बंधू-भगिनींना रक्षासूत्र बांधून प्रसादाचे वाटप करण्यात आले. स्नेह, आत्मीयता आणि आध्यात्मिक अनुभूतीने भारलेल्या वातावरणात रक्षाबंधन स्नेहमिलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.





