जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत १२ हजार कोटींचे सामंजस्य करार, २१ हजार रोजगार निर्मिती शासन देणार उद्योजकांच्या पंखाना बळ – पालकमंत्री संजय शिरसाट
इव्ही हब म्हणून जगात ओळख निर्माण करू – नवीनीकरण ऊर्जा मंत्री अतुल सावे
B1न्यूज मराठी नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर, दि.२९ : जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद २०२६ मध्ये आज २३२ उद्योगांचे १२ हजार ९४४ कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. त्याद्वारे २१ हजार ३०६ जणांना रोजगार उपलब्ध होतील, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्रा मार्फत देण्यात आली.
उद्योजकांच्या पंखाना बळ देण्याचे काम शासन करेल, आपण जिद्दीने आपली वाटचाल सुरु करावी, अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उपस्थित उद्योजकांना आश्वस्त केले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्योगासाठी पोषक वातावरण आहे. आता भविष्यात इलेक्ट्रिक व्हेईकल निर्मितीचे हब म्हणून जगात ओळख निर्माण करू, असा विश्वास राज्याचे इमाव बहुजन कल्याण, नवीनीकरण ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.
उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढावी यासाठी गुंतवणूकदार, व्यावसायिक यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन आज करण्यात आले. ही परिषद हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे पार पडली.
जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद २०२६ च्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट हे होते. तसेच इमाव बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., विभागीय सह आयुक्त (उद्योग) स्वप्नील राठोड, जिल्हा उद्योग केंद्राच्या उपायुक्त श्रीमती करुणा खरात, मैत्री च्या समन्वयक श्रीमती धनश्री जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या परिषदेत १२ हजार ९४४ कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे सामंजस्य करार करण्यात आले. यात २३२ उद्योगांचा सहभाग आहे. यामुळे २१ हजार ३०६ जणांना रोजगार उपलब्ध होतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
पालकमंत्री शिरसाट म्हणाले की,लहान पुरवठादार, उद्योजक ते मोठे उद्योग यांच्यातील साखळी मजबूत केली पाहिजे. उद्योजकांना जिद्दीने झेप घ्यायची असते त्यासाठी त्यांच्या पंखाना बळ देण्याचे काम शासन करेल. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत जागेची मागणी वाढली आहे. त्यात आज सामंजस्य करार केलेल्या उद्योगांना प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले.
सावे म्हणाले की, जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात वाढती गुंतवणूक पाहता दळणवळण, वीज पुरवठा सुविधा, समन्वय केंद्र यासारख्या सुविधा उपलब्धतेचे कामे मार्गी लागले आहेत. उद्योग करणे सुलभ व्हावे यासाठी आवश्यक सुविधा देण्याचे शासनाचे धोरण आहे, असेही श्री. सावे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. म्हणाले की, उद्योगाच्या वाढी साठी शासनाच्या धोरणानुसार प्रशासन तत्परतेने कामे मार्गी लावत आहे. औद्योगिक विस्तारासाठी भुसंपादन प्रक्रिया विविध टप्प्यावर सुरु आहेत. प्रास्ताविक स्वप्नील राठोड यांनी तर सूत्रसंचालन प्रविणा कन्नडकर यांनी केले. या परिषदेस मोठ्या संख्येने उद्योजक सहभागी झाले.





