घरकुल हफ्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणार : खासदार प्रणिती शिंदे
खासदार प्रणिती शिंदे यांचा मंगळवेढा तालुक्यातील येड्राव आणि खवे गावांचा दौरा
B1न्यूज मराठी नेटवर्क
मंगळवेढा : सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील येड्राव आणि खवे या गावांना भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. या भेटीदरम्यान ग्रामस्थांनी विविध स्थानिक समस्यांबाबत खासदारांसमोर थेट मांडणी केली.
येड्राव येथे ग्रामस्थांनी सांगितले की, अनेकांना घरकुल योजना मंजूर झालेली असली तरी जागेअभावी घरे बांधता येत नाही त्यामुळे शासनाने घरकुलासाठी गावठाण अथवा गायरान जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच सध्या मिळणारा पहिला हप्ता फक्त १५,००० रुपये असल्याने त्या रकमेतील फाऊंडेशनचे कामही पूर्ण होऊ शकत नाही, अशी व्यथा ग्रामस्थांनी मांडली.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, घरकुलसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत तसेच घरकुलसाठी पहिला हप्ता ५०,००० रुपयांपर्यंत वाढविण्यासाठी मी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.
दरम्यान, खवे गावातील पाणीटंचाईच्या समस्येवर ग्रामस्थांनी लक्ष वेधले. गावात अजूनही पिण्याच्या आणि वापरण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने विहिरीच्या मागणीस खासदारांनी तत्काळ प्रतिसाद दिला. त्यांनी सांगितले की, इ.एफ.आय. संस्थेमार्फत लवकरच या ठिकाणी विहिरीचे काम सुरू केले जाईल.
ग्रामस्थांनी यावेळी बोगस मतदार नोंदणीचे प्रकरणही समोर आणले. त्यावर प्रतिक्रिया देताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, लोकशाहीच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे. आपण पुरावे द्यावेत, मी निश्चितपणे पाठपुरावा करून चुकीची नोंदणी रद्द करण्याचा प्रयत्न करणार आहे. येणारा काळ लोकशाहीसाठी धोकादायक असून आपण सर्वांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. काँग्रेस नेहमीच तुमच्या पाठीशी उभी आहे.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी खवे येथील वाचनालयासही भेट देऊन स्थानिक तरुणांशी संवाद साधला व वाचन संस्कृतीच्या जतनाची गरज अधोरेखित केली.
या दौऱ्यात काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, प्रदेश सचिव रविकिरण कोळेकर, ज्येष्ठ उपाध्यक्ष सुरेश कोळेकर, येड्राव सरपंच पाटील साहेब, सौदागर खांडेकर, बाबुराव पाटील, दौलत माने, हनुमंत दुधाळ सेठ, तसेच खवे गावचे हनुमंत दुधाळ सर, दुधाळ वकील आणि इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




