सामाजिक जबाबदारीची जपणूक — आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी – शिवसेना तालुकाप्रमुख प्रविण काकडे
B1न्यूज मराठी नेटवर्क
वैराग : अतिवृष्टीमुळे बार्शी तालुक्यातील दहिटणे येथील शेतकरी लक्ष्मण गावसाने यांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली होती. या दुर्दैवी घटनेनंतर गावसाने कुटुंबाच्या मदतीसाठी शिवसेना तालुकाप्रमुख प्रवीण काकडे पुढे सरसावले आहेत. त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत गावसाने यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे.
घटनेची माहिती मिळताच धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि तालुकाप्रमुख प्रवीण काकडे यांनी गावसाने कुटुंबाची भेट घेऊन आर्थिक मदत केली. खासदार राजेनिंबाळकर यांनी समाजातील सर्व स्तरांनी अशा कुटुंबांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत प्रवीण काकडे यांनी वैष्णवी गावसाने — जी सध्या फार्मसीचे शिक्षण घेत आहे — हिच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत जाहीर केली. त्यांनी ओमराजे अर्बन मल्टिसीटी निधीत तिच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेली रक्कम ठेवीच्या स्वरूपात जमा करून ठेवली आहे.
या ठेवीतून वैष्णवीला उच्च शिक्षणासाठी लागणारे शुल्क भरता येणार असून, तिच्या शिक्षणात अडथळा येऊ नये याची काळजी घेतली गेली आहे. प्रवीण काकडे यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे “मानवतेचा संदेश” देणारा आदर्श निर्माण झाला असून, समाजात संवेदनशीलतेचे नवे उदाहरण घालून दिले आहे.




