राष्ट्रीय युवा महोत्सव २०२५-२६ निमित्त रायगड जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन
२९ ऑक्टोबर रोजी होणार जिल्हास्तर स्पर्धा; युवक-युवतींना सहभागासाठी आवाहन
B1न्यूज मराठी नेटवर्क
रायगड-अलिबाग, दि.२५ : युवकांचा सर्वांगीण विकास साधणे, भारतीय संस्कृती व परंपरा जपणे तसेच युवकांच्या सुप्त गुणांना वाव देत राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करणे या उद्देशाने युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकारतर्फे दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
याच पार्श्वभूमीवर सन २०२५-२६ या वर्षातील राष्ट्रीय युवा महोत्सव विकसित भारत चॅलेंज ट्रॅक दि. १० ते १२ जानेवारी २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. त्याअनुषंगाने रायगड जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन दि. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात येणार आहे.
या महोत्सवात युवकांसाठी विविध स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, कथालेखन, चित्रकला, लोकनृत्य (गट), लोकगीत (गट), कवितालेखन, नवोपक्रम (विज्ञानदर्शन) या उपक्रमांचा समावेश आहे.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या १५ ते २९ वयोगटातील युवक-युवती तसेच युवा मंडळांनी २८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं ५ वाजेपर्यंत आपली online नोंदणी dscraigad.2009@rediffmail.com या ई-मेलद्वारे करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी, प्रकाश वाघ यांनी केले आहे.




