दिवसा घरफोडी, चिन्या व रामजाने शहर गुन्हे शाखेकडून जेरबंद
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : दिवसा घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना सोलापूर शहर गुन्हे शाखेने अल्पावधीतच अटक करून तीन लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
२४ सप्टेंबर रोजी कोटणीस नगर येथील अंबिका रेसिडेन्सी व विशाल नगर परिसरात दोन वेगवेगळ्या घरफोड्या झाल्या होत्या. अज्ञात चोरट्यांनी दोन्ही घरांचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने, चांदीचे साहित्य व रोकड असा सुमारे ₹३.६४ लाखांचा मुद्देमाल चोरला होता.
नवरात्र काळात घडलेल्या या गंभीर गुन्ह्यांचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. शैलेश खेडकर यांच्या पथकाने हाती घेतला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटवून पोलिसांनी सूर्यकांत उर्फ चिन्या अनंत माने (वय ३४, रा. चिंचवड, पुणे) व राम उर्फ रामजाने लक्ष्मण क्षीरसागर (वय ३५, रा. वाघोली, जि. धाराशिव) या दोघांना अनुक्रमे ३० सप्टेंबर व ४ ऑक्टोबर रोजी अटक केली.
तपासात आरोपींकडून सुमारे ३ तोळे सोन्याचे दागिने, ६२ तोळे चांदीच्या वस्तू व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण ₹३,१५,२००/- किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील (गुन्हे/विशा), सहायक आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. शैलेश खेडकर व त्यांच्या पथकातील संदीप जावळे, विनोद रजपुत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, राजेश मोरे, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, तात्या पाटील, बापू साठे, चालक बाळासाहेब काळे, सतीश काटे तसेच सायबर शाखेतील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली. गुन्हे शाखेच्या या कौशल्यपूर्ण कारवाईचे शहरात कौतुक होत आहे.




