बार्शी तालुका ठरला जिल्ह्यात अग्रेसर : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीत तहसीलचे उत्कृष्ट नियोजन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या याद्या वेळेत अपलोड करण्याचे जबाबदारीचे आणि संवेदनशील काम जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांकडे सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बार्शी तहसील कार्यालयाने अतुलनीय कामगिरी करून संपूर्ण जिल्ह्यात नंबर वन स्थान पटकावले आहे.
काल सुट्टीचा दिवस असूनही बार्शी तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी आणि अधिकारी कार्यालयात हजर राहून याद्या अपलोड करण्याचे काम मनापासून करत होते. स्वतः तहसीलदार एफ. आर. शेख हे कार्यालयात उपस्थित राहून कॉम्प्युटरवर बसून कामाचे प्रत्यक्ष मार्गदर्शन करत होते.
“आम्ही आमचं 100% देण्याचा प्रयत्न करत आहोत. जितक्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड होतील, तितक्या लवकर त्यांना शासनाची मदत मिळेल,” असे तहसीलदार शेख यांनी स्पष्ट केले.
आज सकाळपर्यंत बार्शी तालुक्यातील ३२,९६७ अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची नावे अपलोड झाली असून, संबंधित शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कम लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती तहसील प्रशासनाकडून देण्यात आली.
बार्शी तहसील कार्यालयाने केलेले हे काम अत्यंत नियोजनबद्ध, वेगवान आणि शेतकरीकेंद्री असल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यसंघात सर्व नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, लिपिक आणि डेटा एंट्री ऑपरेटर यांनी एकदिलाने काम केल्याचे सांगण्यात आले.
या कार्यक्षम कामगिरीमुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये बार्शी तालुका क्रमांक एक ठरला आहे. हे यश तहसीलदार एफ. आर. शेख यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण तहसील प्रशासनाच्या संघटित प्रयत्नांचे आणि जबाबदार कार्यशैलीचे फलित मानले जात आहे.




