‘राष्ट्रीय कला उत्सव’ २० ते २३ डिसेंबर दरम्यान ‘यशदा’ येथे
B1न्यूज मराठी नेटवर्क
पुणे : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण उपक्रम असलेला ‘राष्ट्रीय कला उत्सव २०२५’ यावर्षी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. येत्या शनिवार २० ते मंगळवार २३ डिसेंबर या कालावधीत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे हा उत्सव संपन्न होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या समन्वयाने आणि श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी यांच्या सहकार्याने हा उत्सव पार पडणार आहे. २० तारखेला उद्घाटन झाल्यानंतर २२ डिसेंबरपर्यंत राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धा व २३ डिसेंबर रोजी समारोप व बक्षीस वितरण होणार आहे.
माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने एनसीईआरटी, नवी दिल्लीतर्फे २०१५ पासून दरवर्षी या उत्सवाचे आयोजन केले जात असून यंदाचा हा अकरावा उत्सव आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार कलेला ज्ञानप्राप्तीचे प्रभावी माध्यम मानले गेले असून, या उत्सवातून विद्यार्थ्यांना नवीन शिक्षण धोरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. शिक्षण अधिक सर्जनशील आणि आनंददायी बनवण्याचा यामागे उद्देश आहे.
या उत्सवात देशातील सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांसह केंद्रीय विद्यालये, नवोदय विद्यालये आणि एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी होणार आहेत. ४०५ मुले आणि ५१३ मुली असे ९१८ विद्यार्थी, १०८ शिक्षक आणि ३६ परीक्षक सहभागी होणार असून गायन, वादन, नृत्य, नाटक, दृश्यकला, पारंपरिक कथाकथन इत्यादी १२ विविध कला प्रकारांचे सादरीकरण होणार आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रतिभावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा हा राष्ट्रीय कला महोत्सव शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे. हा उत्सव सहभागींना महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यासह त्यांना संस्मरणीय ठरेल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या संचालक अनुराधा ओक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात व्यक्त केला आहे.




