बार्शी काँग्रेसमध्ये नेतृत्वावर पुन्हा विश्वास; साळुंखे शहराध्यक्ष, पाचकुडवे तालुकाध्यक्षपदी कायम
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीने बार्शी शहर व तालुका पातळीवरील सध्याच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करून संघटनात्मक स्थिरता कायम ठेवली आहे. जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी विजय साळुंखे यांची बार्शी शहराध्यक्षपदी आणि सतिश पाचकुडवे यांची तालुकाध्यक्षपदी पुनर्नियुक्ती केली आहे.
जिल्हा काँग्रेसने या दोन्ही नेत्यांची पक्षनिष्ठा, कार्यक्षमता आणि आतापर्यंत केलेल्या कामाचे बारकाईने मूल्यमापन करून त्यांना पुन्हा संधी दिली आहे. काही महिन्यांपूर्वीच सातलिंग शटगार यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पक्ष वाढीच्या दृष्टीने तालुका पातळीवरील नियुक्त्या नव्याने करण्याचे प्रयत्न सुरू होते. या पार्श्वभूमीवर बार्शी शहर व तालुका नेतृत्वात बदल होणार असल्याची चर्चा होती; मात्र साळुंखे व पाचकुडवे यांच्या कार्यक्षमतेचा सखोल आढावा घेतल्यानंतर ही महत्त्वपूर्ण पुनर्नियुक्ती करण्यात आली.
येत्या काळात नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होणार असल्यामुळे या पदांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या सर्व निवडणुका काँग्रेस पक्षाच्या वतीने साळुंखे व पाचकुडवे यांच्या मार्गदर्शनाखाली लढविण्यात येणार आहेत.
या दोन्ही पदाधिकाऱ्यांवर आता पक्षाची रणनीती ठरवणे, कार्यकर्त्यांना एकत्रित करणे आणि निवडणुका यशस्वी करण्याची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांची जबाबदारी निश्चितच वाढणार आहे. या निर्णयामुळे काही इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये मात्र घोर निराशा दिसून आली आहे. जिल्हा काँग्रेसचे नेतृत्व पक्षाच्या स्थिरतेसाठी आणि आगामी निवडणुकांतील यशासाठी सध्याच्या नेत्यांवर विश्वास ठेवत आहे, अशी प्रतिक्रिया मिळाली आहे.




