विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूरची अवैध ताडी विक्री केंद्रावर धडक कारवाई
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : आगामी विधानसभेची निवडणूक २०२४ लक्षात घेता राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूरने शहरातील विविध भागात अवैध ताडी विक्री आणि हातभट्टी निर्मिती केंद्रांवर जोरदार धडक कारवाई केली आहे. दिनांक १९ ऑक्टोबर २०२४ रोजी, विभागीय उपायुक्त पुणे विभागाचे मा. श्री सागर धोमकर यांच्या निदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. अधीक्षक श्रीमती भाग्यश्री पं. जाधव आणि उपअधीक्षक श्री एस. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
दत्त नगर, रविवार पेठ, ताई चौक, मोदी परिसर आणि नवीन विडी घरकुल कुंभारी परिसर या भागात धाडी टाकून एकूण नऊ संशयित व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ७६१ लिटर ताडी आणि १७५ लिटर हातभट्टी दारू असा एकूण ८०,५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक आर. एम. चवरे, जे. एन. पाटील, ओ. व्ही. घाटगे आणि दुय्यम निरीक्षक एस. डी. कांबळे, आर. एम. कोलते, धनाजी पोवार, समाधान शेळके, सुखदेव सिद, तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, मोहन जाधव आणि संजय चव्हाण यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. या मोहिमेत जवान सर्वश्री आण्णा करचे, नंदकुमार वेळापूरे, शोएब बेगमपुरे, वसंत राठोड, चेतन व्हनंगुटी, इसमाईल गोडीकट, कपील स्वामी, प्रशांत इगोले, अनिल पांढरे, विनायक काळे, वाहनचालक रशीद शेख आणि दीपक वाघमारे, संजय नवले यांनी देखील सहभाग घेतला.
राज्यात अवैध मद्यविक्री आणि वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी यापुढेही कारवाई सुरूच राहील, असे अधीक्षक श्रीमती भाग्यश्री पं. जाधव यांनी सांगितले. अवैध मद्यविक्रीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तातडीने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक ८४२२००११३३ वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सोलापूर शहरातील अवैध ताडी विक्री आणि हातभट्टी निर्मिती केंद्रांवर केलेल्या या धडक कारवाईमुळे स्थानिक गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरली असून कायदा आणि सुव्यवस्थेची खात्री करण्यासाठी पुढील उपाययोजना राबविल्या जातील.