शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कडक आदेश : कार्यालयात ओळखपत्र न लावल्यास शिस्तभंगाची कारवाई
B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र शासनाने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत नेहमीच आपले ओळखपत्र दर्शनी भागावर लावणे बंधनकारक केले आहे. सामान्य प्रशासन विभागाने नव्याने काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट निर्देश दिले असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.
यापूर्वीही २०१४ आणि २०२३ मध्ये अशा सूचना देण्यात आल्या होत्या. तरीदेखील अनेक अधिकारी-कर्मचारी ओळखपत्र लावत नसल्याचे दिसून आल्याने शासनाने पुन्हा कठोर पवित्रा घेतला आहे.
राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी यांनी प्रवेश करताना तसेच कार्यालयात असताना आपले आयडी कार्ड लावणे अनिवार्य असेल. याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुख आणि विभाग प्रमुख यांच्यावर टाकण्यात आली आहे.
