बार्शी विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे धनंजय जगदाळे उमेदवार : तिसऱ्या पर्यायाचा दावा
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून धनंजय जगदाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बार्शीतील प्रस्थापित आजी-माजी नेत्यांविरोधात तिसरा पर्याय म्हणून आपली भूमिका मांडताना त्यांनी प्रस्थापित राजकीय गटांच्या स्वार्थी कारभारावर तीव्र टीका केली आहे. बार्शीच्या राजकारणामध्ये गटातटाचे राजकारण आणि वैयक्तिक फायद्याचे राजकारण बळावले असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.
जगदाळे यांनी स्पष्ट केले की, “बार्शीतील आजी-माजी आमदारांनी गेल्या ३०-४० वर्षांत केवळ आपल्यासाठीच राजकारण केले आहे. स्थानिक कार्यक्रमांत आणि विकासात जनतेसाठी काम करण्याऐवजी या नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठीच प्रॉपर्टी उभी केली आहे. निवडणुका जवळ आल्यावरच हे नेते जनतेसमोर येतात आणि मत मागतात. मात्र, आता जनता त्यांच्या या स्वार्थी राजकारणाला कंटाळली आहे.”
जगदाळे यांनी बार्शीतील युवकांच्या समस्यांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, “तरुणांसाठी रोजगार आणि भविष्यातील स्थैर्य यांसारख्या प्रश्नांवर आजपर्यंतच्या आमदारांनी दुर्लक्ष केले आहे. माझ्या उमेदवारीचा उद्देश केवळ सत्ता मिळवणे नसून, तरुणांच्या हितासाठी सकारात्मक बदल घडवणे आहे.”
धनंजय जगदाळे यांनी सांगितले की, “मी मराठा समाजाचा उमेदवार आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा घटक आहे. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळाले पाहिजे, आणि यासाठी मी माझ्या सर्व ताकदीने प्रयत्न करणार आहे. बार्शीतील जनतेने तिसऱ्या पर्यायाचा विचार करावा, कारण माझी भूमिका केवळ राजकीय स्वार्थासाठी नसून समाजाच्या सर्वांगीण हितासाठी आहे.”
धनंजय जगदाळे यांच्या उमेदवारीमुळे बार्शी विधानसभेत एक नवा तिसरा पर्याय उपलब्ध झाला आहे. प्रस्थापित नेत्यांच्या राजकीय संकुचित मानसिकतेला विरोध करत जनतेला एक नवीन दिशा देण्याचा आणि गोरगरिबांच्या न्याय्य हक्कांसाठी लढण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्यामुळे बार्शीतील मतदार या निवडणुकीत तिसऱ्या पर्यायाचा विचार करतील अशी शक्यता आहे. जगदाळे यांच्या उमेदवारीमुळे बार्शी विधानसभेच्या निवडणुकीत नवीन आव्हान निर्माण झाले आहे.