जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त रेडक्रॉस बार्शी शाखेच्या वतीने आयोजित कृतज्ञता सोहळा संपन्न

जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त रेडक्रॉस बार्शी शाखेच्या वतीने आयोजित कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी डावीकडून अजित कुंकूलोळ, संतोष गिरीगोसावी, विलास रेणके, दिलीप बुडूख, संजीवन मुंढे, सुभाष लोढा, कराड, अशोक डहाळे उपस्थित होते.
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : मानव सेवा ही ईश्वर सेवा हे ब्रीद घेऊन आपदकालीन परिस्थितीत माणुसकी जपत गरजूंना मदतीचा हात देत सेवाभाव जपणार्या इंडीयन रेडक्रॉस सोसायटी उपशाखा बार्शीचे सामाजिक क्षेत्रातील कार्य अनुकरणीय व दिशादर्शक असल्याचे गौरवोदगार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी काढले.
जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त बार्शीच्या श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीच्या स्व.द.ग.कश्यपी सभागृहात रेडक्रॉस बार्शी शाखेच्या वतीने आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बार्शीचे निवासी नायब तहसिलदार संजीवन मुंढे, भगवंत देवस्थानचे सरपंच दिलीप बुडूख, बार्शी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लोढा, रेडक्रॉस बार्शीचे सचिव अजित कुंकूलोळ, उपाध्यक्ष अशोक डहाळे, रक्तपेढीचे डॉ.विक्रम निमकर, डॉ.दिलीप कराड, माजी नगरसेवक विलास रेणके उपस्थित होते. प्रारंभी रेडक्रॉसचे संस्थापक हेन्री डुयनंट यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरवात झाली. प्रास्ताविकात अजित कुंकूलोळ यांनी जागतिक रेडक्रॉस दिनाचे महत्व सांगितले. तसेच बार्शी शाखेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध समाज उपयोगी उपक्रमांची माहिती दिली. यावेळी रक्तदान शिबीर आयोजक, रक्तदाते, पत्रकार बांधव व स्थानिक कलावंतांना रेडक्रॉसच्या वतीने पल्स ऑक्सिमीटर व हॅण्डवॉश कीट मान्यवरांच्या हस्ते भेट देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. सूत्रसंचालन अशोक डहाळे यांनी केले तर आभार डॉ.विक्रम निमकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी रक्तदाते, शिबीर आयोजिक व स्थानिक कलावंत,पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.