वारकरी संप्रदायाचे पुंनरज्जीवन होण्याची गरज : अमोल मिटकरी

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : मार्केटिंगमध्ये प्रवीण असणाऱ्या भोंदू, बुवा-बाबांमुळे समाजाचे मोठे नुकसान होत आहे. माणुसकी धर्म जपणाऱ्या वारकरी संप्रदायाचे पुंनरज्जीवन होण्याची गरज आहे. असे मत विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले.
येथील भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटी आणि मातृभूमी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नगर दैवत श्री भगवंत प्रगट दिनानिमित्त आयोजित सहाव्या भगवंत व्याख्यानमालेत वारकरी संप्रदायाची गौरवशाली परंपरा आणि सद्यस्थिति या विषयावर ते बोलत होते. उद्योजक बन्सीधर शुक्ला अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी नगरपालिकेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, प्राचार्य डॉ.अब्दुल शेख, प्रा.डॉ.आशीष रजपूत,निवासी नायब तहसीलदार संजीवन मुंढे, संयोजक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, सनदी अधिकारी अविनाश सोलवट,प्रतापराव जगदाळे, तहसीलदार धीरज मांजरे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रस्ताविकामध्ये संतोष ठोंबरे यांनी मातृभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून एकविस एकर जमिनीमध्ये क्रीडा प्रशिक्षण केंद्र, व डोळ्यांचे हॉस्पिटल उभारणार असल्याचे सांगितले, तसेच बार्शीकरांना बौद्धिक मेजवानी देण्यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन केल्याचे सांगितले.
मिटकरी यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज, संत कबीर यांचे अभंग सुविचार, सांगत वारकरी संप्रदायाच्या गौरवशाली परंपरेचा आढावा घेतला.
मिटकरी यांनी समाजाला घातक व अनिष्ट रूढीप्रथा अंधश्रध्दावर टीका केली. यावेळी मिटकरी म्हणाले भेद, विषमता, यावर टीका करत संतांनी माणुसकी शिकवली, संतांनी मानवता धर्म सर्व श्रेष्ठ मानला, संतांनी भूतदया, अहिंसा, सदाचार, डोळस भक्ति, विवेक, महिलांविषयी आदर, यांची शिकवण आपल्या कीर्तन-प्रवचनातून दिली. संतांनी अंधश्रद्धा, निर्मूलन केले. संतांनी पर्यावरण प्रेम शिकविले. जेथे कीर्तन-प्रवचन करतो तेथे अन्न सुद्धा घेऊ नये असे संतांनी सांगितले. मात्र आज काही कीर्तनकार हे आपले दुकानदारी उघडून बसले आहेत. ते विनोदाचार्य झाले आहेत, अशा बाजार मांडणाऱ्या आणि पैशाच्या मागे लागलेल्या ढोंगी, अध्यात्म गुरूंपासून समाजाने सावध राहिले पाहिजे. संत गाडगे बाबांनी राज्यात किर्तनांच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करत माणुसकीचा सेवाधर्म सांगितला. त्यांनी ठिकठिकाणी शाळा आणि धर्मशाळा उघडल्या.अशा समाजाला दिशा देणाऱ्या कीर्तनकारांमुळेच माणसातील देव जागृत झाला. अनेकांनी आपल्या जीवनात परिवर्तन घडविले, मात्र धिरज महाराजानंसारखे तथाकथित अध्यात्म गुरु महाराष्ट्रात येतात आणि साईबाबांपासून संत तुकारामापर्यंत अनेकांवर लज्जास्पद शेरेबाजी करतात, हे दुर्दैव आहे. वारकरी संप्रदाय काळाच्या ओघात नामशेष होऊ नये, यासाठी समाजाने पुढे आले पाहिजे, छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू महाराज, हे धार्मिक होते पण अंधश्रद्धाळू नव्हते, असे मिटकरी यांनी सोदाहरण सांगितले.
अपर्णा दळवी यांनी सूत्र संचालन केले. आभार भगवंत मल्टीस्टेट चे उपाध्यक्ष शहाजी फुरडे-पाटील यांनी मानले. याप्रसंगी समाजाच्या विविध स्तरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी मल्टीस्टेट चे सीईओ मिलिंद कांबळे, संतोष नाईक, शाखाधिकारी अक्षय नलगे, नवनाथ भोसले, सूरज कुंभारे,गणेश गायकवाड व मातृभूमी परिवारातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.