संविधानविरोधी विचारांमुळे देशाच्या एकात्मतेला धोका – डॉ.विजय चोरमारे

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : विरोधी विचार नष्ट करण्याची घातक मानसिकता देशात रूढ होत असून संविधानविरोधी विचारांमुळे देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण झाला आहे.अशी खंत जेष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांनी व्यक्त केली. येथील भगवंत मल्टीस्टेट क्रेडीट को. ऑप. सोसायटी व मातृभूमी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भगवंत जयंतीनिमित्त आयोजित ६ व्या भगवंत व्याख्यान मालेचे दुसरे पुष्प भारतीय अमृत महोत्सवी भारत- दशा आणि दिशा या विषयावर गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.संदीप तांबारे होते. यावेळी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, लायन्स क्लब चार्शी टाऊनचे अध्यक्ष अमित कटारीया, सनदी लेखापाल मोसिन शेख, पो नि.कल्याण मोरे, प्राचार्य तुकाराम तनपुरे, संयोजक संस्थाचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, सनदी अधिकारी अविनाश सोलवट, आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
यावेळी डॉ. चोरमारे म्हणाले, सध्या देशात अभिव्यक्ती आणि अविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. आणीबाणी सदृश परिस्थिती आहे. प्रसार माध्यमांची मुस्कटदाबी होत आहे. व्यक्ति स्वातंत्र्याचा संकोच केला जात आहे. निपक्षपाती माध्यमांचा आवाज संपवला जातोय. या देशातील इतिहासाचे खरे संदर्भ आणि महापुरूष यांच्या विचारांना तिलांजली दिली जात आहे. खोटा, चुकीचा आणि सोयीचा इतिहास सांगितला जातो आहे. इतिहासाचे आपल्या सोयीच्या नेत्यांचे उदात्तीकरण आणि त्यागी महापुरूषांच्या विचारांचे विकृती केले जात आहे. देशातील आजपर्यंतच्या वाटचालीतील अपयशाचे खापर पंडीत नेहरूंसारख्या त्यागी राष्ट्रनेत्यांच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न होत असून त्यांची प्रतिमा मलीन केली जात आहे. नेहरूंनी डॉ. विक्रम साराभाई, डॉ.होमी भाभा, यांच्या सारख्या दुरदृष्टीच्या शास्त्रज्ञांच्या मदतीने देशाच्य शैक्षणिक, संशोधन, वैज्ञानिक, अन्विक, प्रगतीला वळण दिले. मात्र आज देशात निधर्मी वातावरण कलुशीत करण्याचे प्रयत्न होत आहेत. देशात फाळणीच्या वेळी दंगल झाली तेंव्हा हिंदुनी मुस्लीमांना व मुस्लीमांनी हिंदूंना आधार देण्याचा प्रयत्न केला. हे वास्तव सांगितले जात नाहीत. उलटपक्षी देशात धर्मांधता पसरविण्याचे प्रयत्न होत आहेत.
द काश्मीर फाईलमध्ये हिंदु पंडीतांच्या छळाचे चित्रण असले तरी तेथेसुध्दा हिंदु-मुस्लीम एकात्मता आहे. मात्र हि वस्तुस्थिती लपवून द केरळा स्टोरी सारख्या चित्रपटांना विशिष्ट विचारांचे समर्थक पुरस्कृत करत आहेत. लोकशाहीमध्ये अतिशय प्रगल्भपणे विरोधी विचार समजून घेतले पाहिजेत. मात्र आपल्या देशात विरोधी नेत्यांना मुळापासून उखडून टाकण्याचे प्रयत्न होत आहेत. यावेळी डॉ. चोरमारे यांनी लोकशाहीची मुल्ये जपण्यासाठी मत स्वांतत्र्याची जोपासना सरकारने केली पाहिजे वृत्तपत्रांचे व कोणत्याही माध्यमांचे सरकारवर अवलबून असलेले हितसंबंध केवळ वस्तुनिष्ठ विचार मांडले नाहीत म्हणून संपवायचा एककलमी कार्यक्रम बंद झाला पाहिजे. स्थानिक परिघामध्ये काम करणाऱ्या छोट्या माध्यमांची स्वायत्ता जपली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रास्ताविकात मातृभूमीचे सचिव प्रताप जगदाळे यांनी बार्शीमध्ये साहित्य संस्कृती यांची मोठी परंपरा आहे. व्याख्यानमालांची परंपरा संपु नये यासाठी भगवंत व्याख्यानमालेचे पुनरूज्जीवन केले असल्याचे सांगितले. डॉ. तांबारे यांनी लोकशाहीच्या संर्वधनासाठी जनतेमध्ये प्रबोधन केले पाहिजे. भगवंत व्याख्यानमालेच्या माध्यमातून प्रबोधन, लोकशिक्षण, मुल्यभान व सामाजिक जाणिवा यांचा प्रसार होत आहे असे सांगितले. शिवाजी पवार व राजकमल हेड्डा यांनी सुत्रसंचालन केले. युवराज कादे यांनी आभार मानले.