सासूच्या पार्थिवाला सुनांनी दिला खांदा

0

वैराग | सासू – सूनांमधले वाद आपल्यासाठी नवे नाहीत. घरापासून ते थेट पोलिस ठाणे आणि कोर्टाच्या पायरीपर्यंत हे वाद गेल्याचे आपण पाहीले आहे. मात्र,बदलत्या परिस्थितीत मुलीप्रमाणे सुना आणि आई प्रमाणे सासू ,असे नाते जपणाऱ्या मुंढे कुटूंबातील सासू-सुनांच्या नात्याचा आदर्श समाजाने घेण्यासारखा आहे. मायेच्या एका धाग्यात ओवलेल्या मुंढे कुंटूबांची माळ बुधवारी तुटली आणि प्रेमळ सासूबाई ह्या माळेतुन निखळल्या. यावेळी सासुबाईंच्या पार्थिवाला चारही सुनांनी खांदा दिला. परंपरेला छेदणारा सासू-सुनांच्या नात्यातील हा प्रत्यय सर्वांसमोर दिशादर्शक ठरला आहे.

मळेगाव (ता. बार्शी ) येथील दमयंती कारभारी मुंडे यांचे वयाच्या ७०व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. अध्यात्माची साथसंगत असलेल्या दमयंती यांनी आयुष्यात देवधर्मासोबतच तत्व आणि मुल्यांचही पालन केलं. त्यांनी आपल्या चारही सुना अनिता यशवंत मुंढे, वैशाली जयवंत मुंढे ,अर्चना गुणवंत मुंढे, आणि मनोरमा बळवंत मुंढे यांना कायम मुलींप्रेमाणे प्रेम आणि माया दिली. या सुनांनीही कधी सासूबाईंचा शब्द खाली पडू दिला नाही की, शब्दाने कधी दुखावले नाही.वृद्धापकाळाकडे झुकलेल्या दमयंती यांना प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे आणि जेव्हाच्या तेव्हा अगदी मागण्याअगोदर हजर असे. त्यातही चौघींपैकी कधी कोणी ‘तू-मी’ असे केले नाही. त्यांच्यातले नाते म्हणजे सासू-सून नाही तर, आई-मुलीप्रेमाणेच फुलत गेले आणि शेवटपर्यंत टिकलेही. दरम्यान, श्रीकृष्णाच्या निस्सीम भक्त असलेल्या दमयंती यांचे श्रीकृष्णाचा वार असलेल्या बुधवारी आणि एकादशीच्या दिवशीच निधन झाले. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. दुपारी अंत्यविधी निघाली त्यावेळी प्रेताला खांदा देण्यासाठी सुना पुढे आल्या. दमयंती यांचे भाऊ चंद्रकांत हरिश्‍चंद्र आणि संभाजी तर मुले यशवंत,जयवंत, गुणवंत, बळवंत यांनी देखील खांदा दिला. दमयंती यांचे पती कारभारी मुंडे हे स्वतः शिक्षक होते. त्यामुळे त्यांनी या बदलास संमती दिली. स्वतः दमयंती या १९९० ते ९५ ह्या काळात पंचायत समितीच्या सदस्य म्हणून कार्यरत होत्या. याशिवाय संपूर्ण राज्यामध्ये जलयुक्त शिवार अभियानातून आपल्या गावाची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या तत्कालीन सरपंच गुणवंत मुंढे यांच्या त्या मातोश्री होत्या. ज्या सासु-सुनांच्या भांडणांचे भांडवल करून टीव्ही सिरीयल जोमात चालतात. आणि त्यांचे अनुकरण करुन आपल्या घरातील वातावरण बिघडवतात अशा सासू सुनांच्या डोळ्यात मुंढे कुंटूबांने झणझणीत अंजन घातले आहे

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या