राज्य शासनाच्या योजनांची माहिती तळागळापर्यंत पोहचवा : अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे

0

सामाजिक न्याय पर्वानिमित्त जनजागृतीचा प्रारंभ

B1न्यूज मराठी नेटवर्क

परभणी : आगामी महिन्याभरात सामाजिक न्याय पर्व अभियानांतर्गत राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती समाजातील तळागळातील नागरिकांपर्यंत पोहचवा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी आज येथे केले. अपर जिल्हाधिकारी डॉ. काळे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात फित कापून या पर्वाचा प्रारंभ करण्यात आला.

उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती स्वाती दाभाडे, सहायक आयुक्त (समाज कल्याण) श्रीमती गिता गुठ्ठे, शिक्षणाधिकारी (मा.) श्रीमती आशा गरुड, सहायक मोटार वाहन निरीक्षक अविनाश चौंढे यांच्यासह जिल्हा यंत्रणेचे प्रमुख उपस्थित होते.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक व मातंग समाजाच्या वस्त्यांना भेटी देणे, त्यांना सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणे, रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ देणे व या योजनेअंतर्गत मातंग समाजासाठी 25 हजार घरे मंजूर करण्याचा निर्णय झाला असून, त्याची अंमलबजावणी करणे. जात वैधता प्रमाणपत्र वाटप, शिक्षण विभागाशी समन्वय ठेवून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळेतून जात प्रमाणपत्र वितरीत करणे आदी सामाजिक न्याय पर्वामध्ये सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनांची माहिती देण्यात येणार असल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील सर्व शाळा- महाविद्यालय शासकीय वसतीगृहामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करणे. शासकीय वसतिगृह व शासकीय निवासी शाळेतील विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र दिनी सत्कार करण्यात येणार असून, शासकीय वसतिगृह व शासकीय निवासी शाळेची प्रवेश प्रक्रिया पार पाडून, समाजकार्य महाविद्यालयाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. शाळेत वाचन प्रेरणा उपक्रम राबवून जिल्हा व तालुकास्तरावर स्वाधार शिष्यवृत्ती, मिनी ट्रॅक्टर लाभार्थी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्तरावर साहित्य वाटप करणे व योजनांची माहिती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यामध्ये समतादुतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य व लघु नाटिकेद्वारे जनतेला सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याविषयी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा, शासकीय वसतीगृह, निवासी शाळा, जेष्ठ नागरिक, तृतीयपंथी, ऊसतोड कामगारांसाठी आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात येणार असल्याचे डॉ. काळे यावेळी म्हणाले.

सफाई कर्मचारी व त्यांचे पुनर्वसन कायदा 2013 जनजागृती कार्यशाळा घेण्यात याव्यात. कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबळीकरण योजनेच्या लाभार्थ्यांची कार्यशाळा घेऊन कृषी गट तयार करावेत. तसेच कृषी संबंधित योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. जिल्हा व तालुकास्तरावर महात्मा फुले जयंतीनिमित्त व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे. ऊसतोड कामगारांना नाव नोंदणी, ओळखपत्र वाटप करणे, ऊसतोड कामगारांसाठी आरोग्य तपासणी व धान्य महोत्सवाच्या आयोजनासह अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता उपक्रमासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी डॉ. काळे यांनी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या