अमरावती विभागात महसूल वसुलीचे 108 टक्के उद्दिष्ट पूर्ण – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय
B1न्यूज मराठी नेटवर्क
अमरावती : महसूल विभागातील पाचही जिल्ह्यांनी महसूल वसुलीची कार्यवाही चांगली पार पाडल्याने विभागाच्या उद्दिष्ट्याच्या 108 टक्के वसुली पूर्ण झाली आहे. शासनाकडून 2022-23 साठी अमरावती विभागात 438 कोटी 27 लक्ष रू. महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. विभागाने त्याहून अधिक म्हणजेच 476 कोटी 3 लक्ष 81 हजार वसुली प्राप्त केली आहे. या वसुलीत विभागातील सर्व जमीन महसूल व गौण खनिज या दोन्हीपासून प्राप्त झालेल्या एकूण रकमेचा समावेश आहे.
विविध जिल्हा प्रशासनांनी केलेल्या कामगिरीबाबत विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ व वाशिम या पाचही जिल्ह्यांत एकूण 138 कोटी 19 लक्ष 71 हजार रू. (103 टक्के) जमीन महसूल प्राप्त झाला आहे.
गौण खनिज उत्पादनांमध्ये विभागाला एकूण 305 कोटी रू. वसुलीचे उद्दिष्ट होते. विभागाने 337 कोटी 75 लाख 95 हजार रू. वसूली केली. अमरावती विभागाच्या दिलेल्या उद्दिष्टाच्या 110.74 टक्के वसूली झाली आहे.
महसूल वसुलीच्या उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल गोळा करून विभागातील जिल्ह्यांनी चांगली कामगिरी पार पाडली आहे. पुढील वर्षी याचप्रकारे उद्दिष्टपूर्ती होण्यासाठी समन्वयाने प्रयत्न व्हावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी दिले आहेत.