मध्यान्ह भोजन वाहनातील डब्यांची जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी केली अचानक पाहणी
B1न्यूज मराठी नेटवर्क
डब्यात तफावत निदर्शनास आल्याने दक्षता घेण्याचे आदेश
औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय हे औरंगाबाद कडे येत असताना (दि २१) त्यांनी बाजार सावंगी येथे रस्त्यावर उभे असलेल्या कामगार विभागामार्फत देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनाच्या वाहनाची अचानक पाहणी केली. यावेळी जेवणाच्या डब्यात तफावत असल्याचे आढळून आले. यादीची तपासणी केली असता यादी आठशे कामगारांची परंतु डबे मात्र कमी असल्याचे निदर्शनास आले.असा प्रकार यापुढे घडणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी संबंधितांना दिले.
शासनाच्या कामगार विभागाच्या वतीने नोंदणीकृत कामगारांना मोफत मध्यान्ह भोजन देण्यात येते. बाजार सावंगी येथे रस्त्यावर मध्यान्ह भोजन पुरवणारे वाहन उभे होते. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आपले वाहन थांबून मध्यान्ह भोजन वाहनाची पाहणी करून कामगारांच्या नावांची यादी तपासली असता वरील प्रकार आढळून आला यापुढे असे प्रकार घडता कामा नये असे आदेश त्यांनी दिले.
दरम्यान कन्नड येथील जवाहर नवोदय विद्यालय येथील विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या हस्ते विद्यार्थिनींना ‘नीट ‘ अभ्यासक्रमाची पुस्तके वाटप करण्यात आली. या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी आस्तिक पाण्डेय यांनी अंधानेर येथील ऑक्सीजन पार्क ला भेट देऊन पाहणी केली. यावेळी सरपंच अशोकराव दाबके, माजी सरपंच कैलास राऊत यांनी त्यांचे स्वागत करून ऑक्सिजन पार्कच्या सुशोभीकरणासाठी निधीची मागणी केली. मनुवाडी येथील अंकुर रोपवाटिका व मका प्रक्रिया उद्योगाला भेट देऊन देखील त्यांनी पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, तहसीलदार संजय वरकड, मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे आदी उपस्थित होते.