जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते बचतगट उत्पादित वस्तूंच्या भव्य प्रदर्शनाच्या बॅनरचे अनावरण
B1न्यूज मराठी नेटवर्क
सिंधुदुर्गनगरी : माविम बचतगटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्री २४ ते २७ मार्च २०२३ रोजी सकाळी १० ते रात्री १० या कालावधीत होणार आहे. या भव्य प्रदर्शन आणि विक्रीच्या बॅनरचे अनावरण जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आले. हे प्रदर्शन आणि विक्री जेटी बंदर, मालवण बीच, मालवण येथे आयोजित केली आहे. या बॅनर अनावरण प्रसंगी महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी नितीन काळे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते उपस्थित होते.
भव्य प्रदर्शन आणि विक्री समारंभाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती जिल्हा समन्वयक अधिकारी (महिला आर्थिक विकास महामंडळ, सिंधुदुर्ग) नितीन काळे यांनी दिली आहे.
जागतिक महिला दिननिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प ( नवतेजस्विनी अंतर्गत) महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) (महाराष्ट्र शासन अंगीकृत) जिल्हा कार्यालयामार्फत जिल्ह्यातील गरीब, गरजू, मागासवर्गीय, विधवा, परितक्ता, भूमिहीन महिला अल्पभूधारक महिला व वंचित महिलासाठी बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे कार्य करीत आहे. सद्यस्थितीत सिंधुदुर्ग मध्ये माविम अंतर्गत ग्रामीण भागात 136 गावात, 1 हजार 14 बचत गटांच्या माध्यमातून एकूण 11 हजार 57 महिला तसेच शहरी भागात 58 वॉर्डामध्ये 275 बचत गटांच्या माध्यमातून 2 हजार 849 महिला असे एकूण 13 हजार 916 महिलांचे संघटन करण्यात आलेले आहे.