विद्यार्थ्यांनीच घेतला पुढाकार; शिक्षक दिनाला कृतज्ञतेचा जागर! बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमध्ये उत्साहात शिक्षक दिन साजरा
शिक्षणासोबत शिस्त, संस्कार अन् सकारात्मक विचारांची जोड आवश्यक : प्राचार्य डॉ. अशोक कदम
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शिक्षकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेतला आणि बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमध्ये शिक्षक दिनाचा सोहळा उत्साहात पार पडला. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महाविद्यालयातील आय.क्यू.ए.सी. आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे नियोजन, सूत्रबद्धता आणि आयोजन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे केल्याने सोहळ्याला विशेष रंगत आली.
भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक कदम होते. कॉलेज ऑफ एज्युकेशनचे सहयोगी प्राध्यापक डॉ. महादेव मते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या मनोगतातून शिक्षकांप्रती कृतज्ञता
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राची मस्तूद यांनी केले, तर साक्षी कदम यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतांतून शिक्षकांप्रती असलेला आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली.
सृष्टी गुंडगिरे, कल्याणी पिंगळे, अंजली बोटे, श्रावणी शिंदे, गीतांजली आणि गीता शिंदे यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व, विद्यार्थ्यांच्या जीवनातील शिक्षकांची भूमिका तसेच योग्य मार्गदर्शनामुळे होणारा सकारात्मक बदल यावर विचार व्यक्त केले. शिक्षक केवळ ज्ञान देत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देऊन जीवनाची योग्य दिशा दाखवतात, ही भावना त्यांच्या मनोगतांतून व्यक्त झाली.
‘पाच जीवनतत्त्वे’ अंगीकारा!
प्रमुख पाहुणे डॉ. महादेव मते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. यशस्वी जीवनासाठी शैक्षणिक ज्ञानाबरोबरच योग्य विचार, सकारात्मक दृष्टिकोन आणि मूल्यांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनात उपयोगी पडणारी ‘पाच महत्त्वाची जीवनतत्त्वे’ सांगून ती प्रत्यक्ष आचरणात आणण्याचे आवाहन केले.
विद्यार्थीदशेत मिळणारे ज्ञान आणि संस्कार यांचा उपयोग केवळ परीक्षेपुरता न करता जीवन समृद्ध करण्यासाठी करावा, असा संदेश त्यांच्या मार्गदर्शनातून मिळाला.
‘ज्ञानाबरोबर संस्कारही महत्त्वाचे’
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अशोक कदम यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत शिस्त, संस्कार, कठोर परिश्रम आणि सकारात्मक विचारसरणी अंगीकारण्याचे आवाहन केले. “केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर चांगले संस्कार आणि शिस्त यांची जोड मिळाल्यासच सक्षम व्यक्तिमत्त्व घडते,” असे त्यांनी सांगितले.
आव्हानात्मक परिस्थितीतही सातत्याने प्रयत्न करत राहणे, वेळेचे भान ठेवणे आणि सकारात्मक दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहणे यामुळे यशाचा मार्ग सुकर होतो. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग स्वतःच्या प्रगतीसोबत समाजाच्या विकासासाठीही करावा, असेही त्यांनी नमूद केले.
शिक्षक-विद्यार्थी नात्यातील आपुलकीचा अनुभव
या कार्यक्रमास आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. बी. डी. लांडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. एम. ए. ढगे, प्रा. के. एम. माळी, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. के. बी. चपटे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. ए. व्ही. पवार यांच्यासह प्रा. एन. आर. सारफळे, प्रा. बी. व्ही. लिंगे, प्रा. एम. एन. मोरे, श्रीमती व्ही. पी. पाटील, श्रीमती एम. पी. शिंदे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन शिवानी पवार यांनी केले, तर सलीम तांबोळी यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेतल्याने शिक्षक दिनाचा हा सोहळा केवळ एक औपचारिक कार्यक्रम न राहता शिक्षकांप्रती कृतज्ञता, आदर आणि शिक्षक-विद्यार्थी नात्यातील जिव्हाळ्याचा अनुभव देणारा सोहळा ठरला.





