श्रीकृष्णासारखे दैवी गुण आत्मसात करा; राजयोगाने जीवनाचा आंतरिक शृंगार करा, गोकुळाष्टमी कार्यक्रमात ब्रह्माकुमारी निशादिदी यांचे प्रतिपादन; रासलीलेतून संस्कार मिलनाचा संदेश

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : श्रीकृष्ण हे दैवी गुणांनी संपन्न असे सत्ययुगातील महाराजकुमार होते. सत्ययुगात आपण सर्वजण सर्वगुणसंपन्न, संपूर्ण निर्विकारी, सोळा कला संपूर्ण व मर्यादा पुरुषोत्तम देवी-देवता होतो. आज परमपिता परमात्मा शिव निराकार ज्योतिर्बिंदू स्वरूपात या सृष्टीवर दिव्य अवतरण करून ज्ञानमुरलीद्वारे मानवाला मार्गदर्शन करीत आहेत. या ईश्वरीय ज्ञानामुळे बुद्धी, दिव्य गुण, दिव्य शक्ती आणि श्रेष्ठ संस्कारांचा आंतरिक शृंगार होत असून, त्यामुळे जीवन चारित्र्यसंपन्न बनते. आंतरिक शृंगार अविनाशी, तर बाह्य शृंगार विनाशी असतो, असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी निशादिदी यांनी केले.

येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या सेवाकेंद्रावर आयोजित गोकुळाष्टमी कार्यक्रमात त्या मार्गदर्शन करीत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्शी सेवाकेंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी संगीतादिदी होत्या.

निशादिदी म्हणाल्या, गोकुळाष्टमीच्या दिवशी प्रत्येक आई आपल्या मुलाला श्रीकृष्णाप्रमाणे वस्त्रे परिधान करून मुकुट, मोरपीस व बासरीने सजवते. या बाह्य शृंगारामुळे मुलांमध्ये आनंद, उत्साह व नवचैतन्य निर्माण होते. मात्र केवळ बाह्य रूप श्रीकृष्णासारखे केल्याने मूल श्रीकृष्णासमान दैवी गुणसंपन्न होत नाही. मुलाने श्रीकृष्णासारखे दैवी गुण आत्मसात करावेत यासाठी आईने प्रथम स्वतःच्या आणि मुलाच्या आंतरिक शृंगाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

श्रीकृष्णाच्या जीवनातील पवित्रता, प्रेम, शांती, सत्यता, निर्भयता, प्रसन्नता, करुणा व सद्गुण हेच त्यांचे खरे सौंदर्य होते. आजच्या काळात मानवी जीवनात या दैवी गुणांची नितांत आवश्यकता आहे. हे गुण विकसित करण्यासाठी राजयोगाच्या माध्यमातून परमात्म्याशी सच्चा संबंध जोडणे गरजेचे आहे.

राजयोगाच्या नियमित अभ्यासामुळे मनाला शांती मिळते, विचारांमध्ये सकारात्मकता निर्माण होते आणि आत्मिक शक्ती वाढते. आपण केवळ हे शरीर नसून परमात्म्याची संतान असलेला चैतन्य आत्मा आहोत, ही आत्मिक जाणीव दृढ होते. त्यामुळे जीवनातील नकारात्मक विचार, विकार व अशांती कमी होऊन प्रेम, शांती, आनंद, पवित्रता आणि शक्ती यांसारखे दैवी गुण विकसित होतात.

परमात्म्याने स्थापन केलेल्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयात येऊन ईश्वरीय ज्ञान व राजयोगाचा साप्ताहिक अभ्यासक्रम पूर्ण करावा आणि आपल्या जीवनाचा आंतरिक शृंगार करून श्रीकृष्णाप्रमाणे दैवी गुणसंपन्न जीवन घडवावे, असे आवाहन निशादिदींनी केले.

राजयोगाच्या प्रकंपनांनी दुःखी आत्म्यांना शांती व शक्ती मिळू शकते

मार्गदर्शनाच्या शेवटच्या टप्प्यात निशादिदींनी महापूर, दुष्काळ, हिंसाचार व युद्ध यांसारख्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले. या आपत्तींमुळे चोहोबाजूंनी दुःख, ताणतणाव व अशांतीचे प्रमाण वाढले आहे. आपत्तीग्रस्तांना स्थूल स्वरूपातील मदतीचा ओघ सुरू आहेच; मात्र या समस्यांमुळे निर्माण होणाऱ्या मानसिक वेदना, भीती, तणाव व अशांततेतून मानवाला मुक्त करण्यासाठी राजयोग ध्यान व विशेष योगसाधनेद्वारे शांती आणि शक्तीची प्रकंपने वातावरणात पसरविणे आवश्यक आहे. ही सकारात्मक प्रकंपने पीडित आत्म्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या मनाला शांती व आत्मिक शक्ती देऊ शकतात.500आजच्या अस्थिर वातावरणात बाह्य परिस्थिती बदलण्याबरोबरच मनुष्याच्या अंतर्मनातही शांती, शक्ती व सकारात्मकतेचा प्रकाश निर्माण होणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीने परमात्म्याशी संबंध जोडून स्वतःमध्ये दैवी गुणांचा विकास केला, तर स्वतःचे जीवन सुखी-शांत होण्याबरोबरच कुटुंब, समाज आणि संपूर्ण विश्वात शांततेचे वातावरण निर्माण होण्यास हातभार लागेल, असे निशादिदींनी स्पष्ट केले.

रासलीले’तून संस्कार मिलनाचा संदेश

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संगीतादिदी म्हणाल्या, श्रीकृष्ण व गोप-गोपिकांची रासलीला प्रसिद्ध आहे. त्या रासलीलेत सहभागी होण्यासाठी सध्याच्या जीवनात आपण परस्परांमध्ये विचार, स्वभाव व संस्कारांच्या मिलनाची रास करणे आवश्यक आहे. राजयोगाच्या नियमित अभ्यासाने संस्कार मिलनाची ही रास सहजपणे होऊ शकते.

बालकांच्या नृत्याने रंगली गोकुळाष्टमी

कार्यक्रमात पाचवीतील बालिका अद्विका बारंगुळे व आराध्या जगदाळे यांनी गोपिकांच्या वेशभूषेत, तर चौथीतील बालक लेखराज शिंदे याने श्रीकृष्णाच्या वेशभूषेत सहभाग घेतला. त्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या गीतावर सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. दोन वर्षांची बालिका गुंजन मोरे हिनेही त्यांच्यासोबत उत्स्फूर्तपणे नृत्य करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाच्या समारोपानंतर उपस्थितांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या गीतावर रासलीलेचा आनंद घेतला. भक्तिमय व आनंदमय वातावरणात गोकुळाष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या