मातृभूमी प्रतिष्ठान व श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या वतीने भगवंत व्याख्यानमालेचे आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मातृभूमी प्रतिष्ठान बार्शी व श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को- ऑप सोसायटी बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने भगवंत प्रकटदिना निमित्त शनिवार दिनांक 21 ते सोमवार दिनांक 23 मे या कालावधीत तीन दिवसीय भगवंत व्याख्यानमालेचे आयोजन केले असल्याची माहिती दोन्ही संस्थांचे अध्यक्ष संतोष ठोंबरे यांनी दिली. व्याख्यानमालेचे यंदाचे पाचवे वर्ष आहे.गेल्या सात वर्षांपूर्वी या व्याख्यान मालेला सुरुवात करण्यात आली होती. मागील दोन वर्षात कोरोना मुळे यात खंड पडला होता. मात्र यंदा पुन्हा बार्शी करांना बौद्धिक मेजवानी मिळणार आहे. यापूर्वी या व्याख्यानमालेत पत्रकार संजय आवटे, सिधुताई सपकाळ, हनुमंतराव गायकवाड, डॉ राजेंद्र भारुड, माधव भंडारी,अभिनेते मोहन जोशी, डॉ लक्ष्मीकांत देशमुख, डॉ जगन्नाथ दीक्षित, तुकाराम मस्के,डॉ सदानंद मोरे आदी नामांकित वक्त्यांनी हजेरी लावून मंत्रमुग्ध केले आहे.
यावर्षी शनिवार दिनांक 21 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते व्याख्यान मालेचे उदघाटन होणार असून त्यादिवशी अभिनेते सयाजी शिंदे यांचे आस्था आणि अनास्था या विषयावर व्याख्यान होणार आहे. अध्यक्ष स्थानी पी. टी पाटील असणार आहेत. रविवार दि.22 रोजी संभाजी ब्रिगेड चे प्रवीण गायकवाड यांचे अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलुख आपला या विषयावर दुसरे पुष्प असणार आहे. अध्यक्षस्थान पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले भूषवणार आहेत. सोमवार दिनांक 23 रोजी शिव व्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांचे यशाचा पासवर्ड या विषयावर तिसरे पुष्प असणार आहे. या समारोप सोहळ्याचे अध्यस्थानी प्रिसीजन फाउंडेशन च्या अध्यक्षा डॉ सुहासिनी शहा असणार आहेत.
यशवंतराव चव्हाण सभागृहात दररोज सांयकाळी 7 वाजता ही व्याख्याने होणार आहेत. तिन्ही दिवशी शहरातील प्रमुख मान्यवरांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.या व्याख्यान मालेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मातृभूमीचे सचिव प्रताप जगदाळे ,मल्टीस्टेट चे सचिव प्रदीप औसेकर यांनी केले आहे.