विविधतेतून एकतेचे दर्शन: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ‘पारंपरिक दिन’ उत्साहात साजरा
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ’पारंपरिक दिना’ने संपूर्ण परिसर भारतीय संस्कृतीच्या रंगात न्हाऊन निघाला. विद्यार्थ्यांनी विविध राज्यातील वेशभूषा साकारत आणि सोलापूरच्या अस्मितेचा मानबिंदू असलेला ’बाराबंदी’ पोषाख परिधान करून सामाजिक एकतेचा अनोखा संदेश दिला.सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे आणि डॉ. प्रभाकर कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपारिक सांस्कृतीक दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय समाज संस्कृतीची जपणूक करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी केवळ पोषाखच नाही, तर कलेच्या माध्यमातूनही भारतीय संस्कृतीचे सादरिकरण केले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे वासुदेवाचा पोषाख, सोलापूरचा पारंपरिक ’बाराबंदी’ पोषाख.धनगरी पोषाख, विद्यार्थ्यांनी हा पोषाख परिधान करून सोलापूरच्या जुन्या वैभवशाली परंपरेला उजाळा दिला. यासोबतच महाराष्ट्राची नऊवारी साडी, फेटा, तसेच पंजाब, गुजरात, दक्षिण भारत आणि उत्तर भारतातील विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे पेहराव विद्यार्थ्यांनी केले होते. विविधतेत एकता हे केवळ ब्रीदवाक्य नसून ते प्रत्यक्ष जगण्याची ओढ विद्यार्थ्यांच्या उत्साहातून ओसंडून वाहत होती.
सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे पदर उलगडण्यात आले. कुणाल बाबर आणि रश्मी मोहळकर या विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत भरली. विठोबाचे देणे या सादरीकरणातून महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचा आणि भक्तीरसाचा वारसा मांडण्यात आला. विठ्ठलाप्रती असलेली श्रद्धा आणि भक्तीचे दर्शन घडवताना प्रेक्षकही तल्लीन झाले होते. प्रेमाच्या छटा मानवी नातेसंबंधातील विविध पैलू आणि प्रेम या विषयावर आधारित या सादरीकरणालाही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. रशीद निंबाळकर यांची ’किरण’ ही शॉर्टफिल्म सामाजिक विषयावर भाष्य करणार्या या कलाकृतीने विद्यार्थ्यांना विचारप्रवृत्त केले. मनोरंजनासोबतच समाजातील वास्तव मांडणार्या या लघुपटाने विचार करण्यास भाग पाडले.
कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभ पार पडला. प्रा. डॉ. प्रभाकर कोळेकर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि पारंपरिक दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. कोळेकर म्हणाले की, आजच्या जागतिकीकरणाच्या युगात आपली संस्कृती आणि परंपरा टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान तरुणांसमोर आहे. सामाजिक शास्त्रे संकुलातील विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले आहे, ते कौतुकास्पद आहे. शिक्षण म्हणजे केवळ पदवी नव्हे, तर आपल्या संस्कृतीशी जोडून राहणे होय. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पुर्वा मुडके, साक्षी सावंत यांनी केले. तर आभार सागर मुडके यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला सामाजिक शास्त्रे संकुलाचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.





