जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने ध्वजदिन निधीसाठी मोलाचे योगदान द्यावे – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
B1न्यूज मराठी नेटवर्क
अहिल्यानगर, दि. १५ : देशासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने ध्वजदिन निधीसाठी मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व ब्रिगेडिअर रोहित मेहता यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाला कर्नल प्रसाद मिजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वॉड्रन लीडर विद्यासागर कोरडे (निवृत्त) आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, देशाच्या सीमेवर अहोरात्र लढा देणाऱ्या आणि राष्ट्रासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. या सैनिकांच्या कुटुंबीयांना सन्मानाने व सुरक्षिततेने जीवन जगता यावे, त्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात तसेच त्यांच्या विविध समस्या वेळेत सोडविता याव्यात, यासाठी ध्वजदिन निधी संकलन अत्यंत महत्त्वाचे आहे.
ध्वजदिन निधीच्या माध्यमातून शहीद व माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य, पुनर्वसन, शिक्षण, वैद्यकीय उपचार तसेच सामाजिक सुरक्षितता प्रदान करण्यात येते. त्यामुळे हा निधी केवळ आर्थिक संकलन नसून तो देशाच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या सैनिकांच्या त्यागाला दिलेला आदराचा सलाम असल्याचेही ते म्हणाले.
सर्वांच्या सक्रिय सहभागातून आणि एकत्रित प्रयत्नांमुळे मागील दोन वर्षांपासून आपला जिल्हा ध्वजदिन निधी संकलनामध्ये राज्यात अग्रस्थानी आहे. या उल्लेखनीय यशासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांचे त्यांनी अभिनंदन केले व मनःपूर्वक आभार मानले. यावर्षीही सर्वांनी त्याच उत्साहाने व जबाबदारीच्या भावनेने सहभाग घ्यावा, दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक निधी संकलित करून जिल्ह्याची ही गौरवशाली परंपरा कायम राखावी, असा विश्वासही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी व्यक्त केला. सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी आपण उभे राहतो, हीच खरी राष्ट्रभक्ती असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
ब्रिगेडिअर रोहित मेहता म्हणाले, सैन्य सेवेत दाखल होणारा प्रत्येक जवान हा केवळ नोकरी स्वीकारत नाही, तर तो देशसेवेचा पवित्र वसा घेतो. मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देण्याची तयारी ठेवूनच तो सैन्यात दाखल होतो. देशातील कोट्यवधी नागरिकांची सुरक्षितता ही या जवानांच्या खांद्यावर सोपविण्यात आलेली असते.
भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात भाषा, धर्म, जात-पंथ यांपलीकडे जाऊन एकतेचे दर्शन घडवणारा घटक म्हणजे भारतीय सैनिक होय. ‘देश प्रथम’ या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन सैनिक खांद्याला खांदा लावून लढतात. सीमारेषेवर उभा असलेला सैनिक हा केवळ बंदूकधारी योद्धा नसून तो देशाच्या स्वातंत्र्याचा, सार्वभौमत्वाचा आणि अखंडतेचा रक्षक असतो. सैनिकांच्या या त्यागामुळेच देशातील नागरिक सुरक्षितपणे आपले दैनंदिन जीवन जगू शकतात. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने सैनिकांच्या बलिदानाची जाणीव ठेवून त्यांच्याप्रती आदर, कृतज्ञता आणि अभिमान बाळगणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात कोरडे म्हणाले, भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले, अशा जवानांच्या कुटुंबीयांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करून त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी, युद्धात अपंगत्व आलेल्या तसेच सेवानिवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनाकरिता सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन करण्यात येते. सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि नव्या पिढीत राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम राबविला जातो. गतवर्षात ४ कोटी ७५ लक्ष रुपयांच्या विक्रमी निधीचे संकलन करून आपला जिल्हा राज्यात निधी संकलनामध्ये अग्रेसर ठरला. राज्यस्तरीय कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते जिल्ह्याचा गौरव करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक कामगिरीबद्दल विशेष गौरव पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले. तसेच निधी संकलनामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध शासकीय कार्यालय प्रमुखांचा व सामाजिक संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ.अमोल बागुल यांनी केले तर आभार कल्याण संघटक चंद्रकांत शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, माजी सैनिक, माजी सैनिकांचे कुटुंबीय, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता आदी उपस्थित होते.




