वाहन सेवांशी संबंधित फसव्या लिंकपासून नागरिकांनी सावध राहावे – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांचे आवाहन
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर, दि. 15 : प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर यांनी सर्व नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स, ई-चलन अशा सेवांशी संबंधित बनावट वेबसाइट्स, फसवे मोबाईल ॲप्स (APK files) तसेच SMS किंवा WhatsApp द्वारे पाठविल्या जाणाऱ्या खोट्या लिंकद्वारे नागरिकांची दिशाभूल होत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या माध्यमातून वाहन चालक व मालकांची आर्थिक फसवणूक, वैयक्तिक माहिती चोरी आणि ओळखीचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. कोणताही संशयास्पद संदेश आल्यास त्यातील लिंकवर क्लिक न करता, केवळ अधिकृत शासकीय वेबसाइटवर जाऊन खात्री करावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी केले आहे.
फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी :-
नागरिकांनी केवळ परिवहन विभागाच्या अधिकृत शासकीय संकेतस्थळांचा वापर करावा.
वाहन नोंदणी सेवा (VAHAN): https://vahan.parivahan.gov.in
ड्रायव्हिंग लायसन्स सेवा (SARATHI): https://sarathi.parivahan.gov.in
परिवहन सेवा: https://parivahan.gov.in
ई-चलन पोर्टल: https://echallan.parivahan.gov.in
महत्त्वाचे म्हणजे, सर्व अधिकृत संकेतस्थळे ही “.gov.in” ने समाप्त होतात. नागरिकांनी “.com”, “.online”, “.site”, “.in” किंवा इतर खाजगी डोमेनवरील वेबसाइट्सवर माहिती भरू नये.
फसव्या संदेशांचे प्रकार :-
फसवणूक करणारे नागरिकांना खालीलप्रमाणे संदेश पाठवतात –
“आपल्या वाहनाचे चलन बाकी असून त्वरित दंड भरा, अन्यथा कारवाई होईल.”
“तुमचे DL सस्पेंड होणार आहे, त्वरित या लिंकवर क्लिक करून तपासणी करा.”
अनधिकृत लिंक पाठवून त्वरित पैसे भरण्याचा आग्रह करणे.
नागरिकांनी हे लक्षात ठेवावे की, RTO कार्यालय किंवा परिवहन विभागाकडून WhatsApp द्वारे कधीही पेमेंट लिंक पाठविली जात नाही. तसेच “RTO Services.apk”, “mParivahanUpdate.apk”, “eChallanPay.apk” अशा अनधिकृत ॲप्स डाउनलोड करू नयेत. या ॲप्सद्वारे OTP, बँकिंग माहिती व मोबाईलमधील संवेदनशील माहिती चोरीला जाण्याची शक्यता असते.
तक्रार नोंदविण्याची ठिकाणे :-
National Cyber Crime Portal: https://www.cybercrime.gov.in
सायबर फसवणूक हेल्पलाइन: 1930
सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशन हेल्पलाइन: 02172744616, 9011580100
ईमेल: picybercrime.cpsol@mahapolice.gov.in




