वानखेडेवर ‘प्रोजेक्ट महादेवा’चा दिमाखदार शुभारंभ; महाराष्ट्राच्या फुटबॉल स्वप्नांना जागतिक व्यासपीठ
B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा उपक्रम ‘प्रोजेक्ट महादेवा’चा भव्य शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वानखेडे स्टेडियम येथे झाला. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA), व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन (VSTF), वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA), सिडको (CIDCO) आणि राज्याच्या क्रीडा विभागाच्या संयुक्त सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या सोहळ्यास जागतिक फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी, अर्जेंटिनाचे माजी खेळाडू लुईस सुआरेझ व रॉड्रिगो डिपॉल यांच्यासह क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, खासदार प्रफुल्ल पटेल, भारतरत्न सचिन तेंडुलकर, भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री, संघाचा कर्णधार राहुल भेके, MITRA चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, अमृता फडणवीस, तसेच क्रीडा, उद्योग व मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. थोडक्यात, मैदानावर फक्त चेंडूच नव्हता तर ‘स्टार पॉवर’ही होती.
‘मिशन ऑलिम्पिक २०२६’ अंतर्गत महाराष्ट्रातून अधिकाधिक सुवर्णपदके मिळवणे आणि २०३४ पर्यंत फुटबॉल विश्वचषकाच्या तयारीचे लक्ष्य ठेवून ‘प्रोजेक्ट महादेवा’ राबविण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या प्रकल्पातून नक्कीच दर्जेदार व जागतिक पातळीवरील खेळाडू घडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी, “प्रेक्षकांच्या पाठिंब्याशिवाय कोणतीही मोठी कामगिरी शक्य नाही. आज वानखेडेवर उभा राहिल्यावर २०११ च्या विश्वचषकाची आठवण झाली. आजचा क्षण सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल,” असे गौरवोद्गार काढले.
‘प्रोजेक्ट महादेवा’ अंतर्गत राज्यभरातून १३ वर्षांखालील फुटबॉल प्रतिभेचा शोध घेण्यात येणार असून, निवड झालेल्या ६० खेळाडूंना (३० मुले, ३० मुली) पाच वर्षांसाठी संपूर्ण निवासी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. परदेशी प्रशिक्षकांकडून जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, शैक्षणिक व क्रीडा विकासाच्या संधी या प्रकल्पाची वैशिष्ट्ये आहेत. एकूणच, ‘प्रोजेक्ट महादेवा’ हा केवळ क्रीडा उपक्रम नाही, तर महाराष्ट्राच्या फुटबॉल भवितव्याची ब्लूप्रिंट आहे. मैदान तयार आहे, खेळाडू निवडले जातील; आता गोल्स महाराष्ट्राकडून अपेक्षित आहेत.




