धाराशिवचा जितेंद्र वसावे ‘विवेकानंद’, सांगलीची सानिका चाफे ‘सावित्री’ पुरस्काराची मानकरी

0

५१ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा

B1न्यूज मराठी नेटवर्क

कुमारांचे राज्य अजिंक्यपद धाराशिवला तर मुलींचे सांगलीला

अहिल्यानगर : (क्री. प्र.) : ५१ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचा रोमांचक समारोप झाला. कुमार गटात धाराशिवने सलग दुसऱ्या वर्षी अजिंक्यपद पटकावत इतिहास रचला, तर मुली गटात सांगली जिल्ह्याने अप्रतिम खेळ करत विजेतेपद नावावर केले. या स्पर्धेत धाराशिवचा जितेंद्र वसावे व सांगलीची सानिका चाफे यांनी अनुक्रमे विवेकानंद व सावित्री या सर्वोत्कृष्ट अष्टपैलू पुरस्कारांवर आपली मोहोर उमटविली.

मुली गट – सांगलीचा जिद्दी विजय
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले युवा प्रतिष्ठान, विश्वंभरा प्रतिष्ठान व बाणेश्वर क्रीडा मंडळ बुऱ्हाणनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केली होती. अहिल्यानगर येथील श्री बाणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बुऱ्हाणनगर येथे झालेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत गतविजेत्या धाराशिवला पराभूत करणाऱ्या ठाणे जिल्ह्याचा आत्मविश्वास उंच होता, परंतु अंतिम सामन्यात सांगलीने अद्भुत प्रतिकार करत ३०-२८ ने विजय मिळवला. मध्यंतरास सांगलीकडे १६-१२ अशी आघाडी होती आणि ती त्यांनी अखेरपर्यंत सांभाळली. त्यांच्या सानिका चाफेने २.२७ व २.३० मिनिटे संरक्षण, ८ गुण अशी जबरदस्त अष्टपैलू कामगिरी केली. श्रावणी तामखेडे – (२.३० नाबाद व १.१८ मिनिटे संरक्षण.) सानिया सुतार व विद्या तामखेडेने प्रत्येकी ४ खेळाडू बाद केले. तर पराभूत ठाण्याकडून ठाण्याकडून प्रणिती जगदाळेने आपल्या धारदार आक्रमणात आठ खेळाडू बाद करताना संरक्षणात २.१० व १.४० मि. संरक्षण अशी भक्कम बाजू सांभाळली. धनश्री कंक (१.५०, २ मि. संरक्षण) व दीक्षा काटेकर (१.१०, २.०७ मिनिटे संरक्षण व २ गुण ) यांनी उत्कृष्ट खेळ केला. श्रुती चोरमारे व अक्षरा भोसले यांनी आक्रमणात प्रत्येकी ४-४ खेळाडू बाद केले. श्रुतीने १.१० मिनिटे पळतीही केली. परंतु यांची खेळी ठाण्यास विजय मिळवून देऊ शकली नाही

कुमार गट – धाराशिवची दणदणीत खेळी
गतविजेते धाराशिवने सोलापूरवर २६-२० असा विजय मिळवत पुन्हा विजेतेपदाला गवसणी घातली. मध्यंतरासच १६-८ अशी आघाडी घेत संघाने सामन्यावर पकड मजबूत केली. त्यांच्या जितेंद्र वसावे (१.३० मि. संरक्षण व ६ गुण), सोत्या वळवी (नाबाद १, २.२० मि. संरक्षण व ४ गुण), राज जाधव (१.४६ मि. संरक्षण व ४ गुण) तर पराभूत सोलापूरकडून शंभूराज चंदनशिव (१.१९ मि. संरक्षण व ६ गुण), सिद्धार्थ माने देशमुख (१.५१ मि. संरक्षण व ४ गुण), अरमान शेख (१.२० मि. संरक्षण व ४ गुण) यांची लढाऊ अष्टपैलू कामगिरी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू
अष्टपैलू : जितेंद्र वसावे (धाराशिव), सानिका चाफे (सांगली)
आक्रमक : शंभूराज चंदनशिव (सोलापूर), प्रणिती जगदाळे (ठाणे)
संरक्षक : सोत्या वळवी (धाराशिव), श्रावणी तामखेडे (सांगली)

या स्पर्धेचे बक्षीस वितरण पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले, शीतल जगताप, डॉ. महेश मुळे, बाणेश्‍र चेमटे, सरपंच रावसाहेब कर्डिले, सीए अध्यक्ष राजेंद्र काळे, मनीषा बारस्कर, चेअरमन संभाजी कर्डिले, ज्ञानेश्‍वर जाधव, बाळासाहेब कर्डिले, सुधीर दुसंगे, उज्ज्वला चेमटे यांच्यासह महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. चंद्रजित जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अॅड. गोविंद शर्मा यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी तसेच अनेक पदाधिकारी, कार्कर्ते व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

विजयाचा थरार, खेळाडूंची जिद्द! अंतिम सामने महाराष्ट्र खो-खोला नव्या उंचीवर नेणारे अविस्मरणीय संग्राम ठरले. उत्साही प्रेक्षकांच्या उपस्थितीत, उत्कृष्ट नियोजन आणि तुफानी संघर्षाने भरलेली ही स्पर्धा महाराष्ट्र खो-खोच्या वैभवशाली भविष्याची दिशा दाखवून गेली खेळ भावना, रणनीती आणि वेगाचा अप्रतिम मिलाफ म्हणजे खो-खो!

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या