जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते दृष्टिहीन महिला क्रिकेटपटू गंगा कदम यांचा सत्कार

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर दि. 09 : गंगा कदम या दृष्टिहीन महिला क्रिकेटपटू असून त्यांनी नुकत्याच झालेल्या महिलांच्या टी-20 विश्वचषक (ब्लाइंड) स्पर्धेमध्ये भारतीय संघासाठी उपकर्णधार म्हणून मोलाची भूमिका बजावली असून, भारताने हा ऐतिहासिक विश्वचषक जिंकला आहे. त्यानिमित्ताने गंगा कदम यांचा सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख यांच्या सह सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.
दृष्टीहीन क्रिकेट खेळाडू गंगा कदम यांचे मूळ गाव सोलापूर असून त्या एका शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांच्या कुटुंबात सात बहिणी आणि एक भाऊ आहेत. त्यांचे वडील त्यांना क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी नेहमी प्रोत्साहन देत असत. त्या सध्या दादर येथील कीर्ती कॉलेज मध्ये मास्टर्स इन सोशल वर्क (MSW) चे शिक्षण घेत आहेत.

गंगा कदम या भारतीय महिला दृष्टिहीन टी-20 क्रिकेट संघाच्या उपकर्णधार असून ,त्यांनी महाराष्ट्राच्या संघाचे कर्णधारपद देखील भूषवले आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या पहिल्या दृष्टिहीन महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने विजेतेपद मिळवण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांनी 41 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. क्रिकेटच्या मैदानात त्या त्यांच्या प्रभावी थ्रो (throw) आणि अष्टपैलू कामगिरीसाठी ओळखल्या जातात, त्यामुळे त्यांचा जर्सी क्रमांक 007 असा आहे अशी त्यांची क्रिकेट मधील कारकीर्द आहे.

शेतकरी कुटुंबातून आलेल्या गंगा कदम यांनी, दृष्टीहीन असूनही, आपल्या कठोर मेहनतीने आणि जिद्दीने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांची ही कामगिरी अनेक मुली आणि दिव्यांगांसाठी खूप प्रेरणादायी आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव उंचावले आहे. आशा शब्दात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या