लोकअदालतीत ई-चलान तडजोड नाही; पोलिस विभागाचा इशारा — अफवांपासून सावध रहा

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई : येत्या १३ डिसेंबर २०२५ रोजी राज्यभर आयोजित होणाऱ्या लोकअदालतीत ई-चलान प्रकरणांची तडजोड कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही, असे स्पष्टीकरण अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहे.

सन २०२५ पासून प्रलंबित ई-चलान प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी वाहतूक विभागाने महाराष्ट्र राज्य विधी आणि सेवा प्राधिकरणाच्या मंजुरीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र आगामी लोकअदालतीत एकही ई-चलान प्रकरण तडजोडीसाठी ठेवले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, काही यूट्यूब, इंस्टाग्राम व अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकअदालतीत ई-चलान दंडात सवलत मिळणार असल्याचा खोटा प्रचार करण्यात येत असल्याचे आढळले आहे. अशा चुकीच्या माहितीमुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असल्याने पोलिस विभागाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

ई-चलान तडजोड किंवा दंडात सवलत यासंदर्भात सोशल मीडियावरील पोस्ट्स, अनधिकृत लिंक यांवर विश्वास ठेवू नये, असा इशाराही देण्यात आला आहे.

जर एखाद्या नागरिकाचे प्रकरण स्थानिक जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाने तडजोडीसाठी ठेवले असेल, तर त्यांनी संबंधित न्यायालय किंवा स्थानिक वाहतूक पोलीसांशी थेट संपर्क साधावा, असे पोलीस अधीक्षक (मुख्यालय) सुनील भारव्दाज यांनी अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाच्या वतीने कळविले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या