पोलीस अंमलदारांना गुन्हे तपास प्रशिक्षणामुळे दोषसिद्धीचे प्रमाण वाढण्यास मदत – पोलीस अधीक्षक संदीप घुगे
471 पदवीधर पोलीस अंमलदारांच्या गुन्हे तपास प्रशिक्षणाची सांगता
B1न्यूज मराठी नेटवर्क
सांगली : गुन्हे तपासविषयक प्रशिक्षण घेतलेले पदवीधर पोलीस अंमलदार हे त्यांच्याकडे सोपविलेल्या कोणत्याही गुन्ह्यांचा तपास बिनचूक व शास्त्रशुद्ध पद्धतीने करतील. त्यातून दोषसिद्धत्वाचे प्रमाण वाढण्यास मदत होऊन, याद्वारे ते समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील, असा विश्वास पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी व्यक्त केला. पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची – तासगाव येथील राज्य पोलीस दलातील विविध घटकातील 07 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या 471 पदवीधर पोलीस अंमलदारांच्या गुन्हे तपासविषयक प्रशिक्षण सत्र क्र. 1 च्या सांगता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
बहुउद्देशीय हॉल येथे आयोजित या कार्यक्रमास पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची-तासगावचे प्राचार्य धीरज पाटील, पोलीस निरीक्षक हनुमंत वेताळ, सहायक पोलीस निरीक्षक एकता पवार, प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. गुन्हे तपासाचे व दोषसिद्धीचे महत्त्व विशद करताना पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे सायबर क्राईम, आर्थिक गुन्ह्यांचे स्वरूप क्लिष्ट झाले आहे. अशा गुन्ह्यांची शास्त्रशुद्धपणे उकल होऊन त्यामध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे.
या प्रशिक्षणात आत्मसात केलेल्या ज्ञानाचा प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्षात गुन्ह्याच्या तपासावेळी निश्चितच फायदा होणार आहे. काहीवेळा केवळ गुन्हे तपासातील त्रुटींमुळे व पुराव्याअभावी आरोपी निर्दोष सुटतात, अशावेळी दोषसिद्धीकरिता या प्रशिक्षणातील ज्ञानाचा नक्कीच उपयोग होईल व त्यामुळे गुन्ह्यातील दोषसिद्धत्व होवून अन्यायग्रस्त पीडितास न्याय मिळवून देण्याचा आनंद फार मोठा असल्याचे मत व्यक्त करून त्यांनी प्रशिक्षणाथींना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकात प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य धीरज पाटील म्हणाले, गुन्हे तपास विषयक प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्रामध्ये राज्यातील विविध घटकातून उपस्थित राहिलेले सर्व पात्र पदवीधर पोलीस अंमलदार हे आता सर्व प्रकारच्या आव्हानात्मक व गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा शास्त्रोक्त तपास व उकल करण्याकरिता सर्वार्थाने सज्ज झाले आहेत.
प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यामुळे यातील ज्ञानाचा वापर करून सर्वजण तपासी अंमलदाराची भूमिका उत्कृष्टपणे बजावतील, असे मत व्यक्त करून त्यांनी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या. पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पदवीधर पोलीस अंमलदार यांचे गुन्हे तपासविषयक प्रशिक्षणाचे सत्र क्र. १ हे ३ नोव्हेंबरपासून ४ आठवडे कालावधीकरिता आयोजित करण्यात आले होते.
त्यामधील 471 पदवीधर पोलीस अंमलदार हे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, धाराशिव, लातूर, बीड, पालघर, ठाणे ग्रामीण, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण आणि लोहमार्ग-मुंबई, लोहमार्ग-पुणे अशा एकूण 15 पोलीस घटकांमधून आलेले होते. या 4 आठवड्यांच्या प्रशिक्षण कालावधीत त्यांना गुन्हे तपासाच्या अनुषंगाने, सुधारित भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष संहिता यांचे प्रशिक्षण देण्यात आले.
तसेच किरकोळ कायदे यामधील महाराष्ट्र पोलीस अधिनियम दारूबंदी अधिनियम, जुगार प्रतिबंधक अधिनियम, मोटार वाहन कायदा, प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध करणारा अधिनियम, JJ Act, इत्यादी कायदे आणि पोलीस स्टेशनला एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा एफ. आय. आर., घटनास्थळ पंचनामा, पुरावे गोळा करणे, जबाब घेणे, आरोपी अटक करताना घ्यावयाची दक्षता, आरोपींची विचारपूस, तंत्र, पोलीस स्टेशनला दाखल होणारे अकस्मात जळीत, मोटार अपघाताचे गुन्हे, चोरीचे गुन्हे, अंगुली मुद्रा, सायबर गुन्हे या विषयांचे सखोल ज्ञान देण्यात आले आहे. प्रशिक्षणाअंती, घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये 469 प्रशिक्षणार्थी पदवीधर पोलीस अंमलदार हे उत्तीर्ण झाले आहेत.
त्यातील विशेष प्राविण्य मिळवलेल्या प्रशिक्षणार्थींना पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन सहायक पोलीस निरीक्षक एकता पवार यांनी केले. आभार पोलीस निरीक्षक हनुमंत वेताळ यांनी मानले.




