मराठी ग्लोबल चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरचे उद्घाटन

0

“जागतिक पातळीवर मराठी उद्योजकतेस नवी चालना- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे”

B1न्यूज मराठी नेटवर्क

पुणे : मराठी ग्लोबल चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चर – पुणे कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. मराठी उद्योजकांना जागतिक पातळीवर मजबूत व्यासपीठ मिळावे, परदेशातील मराठी समुदायाशी दृढ संबंध जोडले जावेत आणि शासन–उद्योजक यांच्यात समन्वय वाढावा, याबाबत त्यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.

कार्यक्रमात मराठी ग्लोबल चेंबर ऑफ कॉमर्सचे सेक्रेटरी शिरीष फडतरे यांनी चेंबरच्या कार्याचा, उद्दिष्टांचा परिचय करून दिला. उद्घाटन सोहळा फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया परिसरातील चेंबर कार्यालयात झाला.

यावेळी आपल्या भाषणात डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, विधिमंडळातर्फे परदेशातील मराठी मंडळींशी तसेच उद्योजकांशी संवादाचे विविध कार्यक्रम सातत्याने होत असतात. “फक्त संसदीय भेटी किंवा वैधानिक कामांपुरते आमचे दौरे मर्यादित नसतात. परदेशातील मराठी समुदायाच्या संस्कृती, रोजगार, स्थलांतरितांच्या अडचणी आणि उद्योजकतेच्या संधी यावर आम्ही प्रत्यक्ष चर्चा करतो,” असे त्या म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या की, जपान, युरोप, अमेरिका या देशांमध्ये भेटीदरम्यान अनेक महत्त्वपूर्ण निरीक्षणे समोर आली. “इतर राज्यांचे उद्योजक परदेशात सक्रियपणे करार करून सहकार्य वाढवत आहेत. महाराष्ट्रातूनही अशीच चळवळ गतिमान करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स मोठ्या प्रमाणावर चालू असतानाही त्यांची माहिती सादर करणारी ‘नॉलेज बँक’ अद्याप प्रभावीपणे तयार केलेली नाही,” असा मुद्दा डॉ. गोऱ्हे यांनी मांडला.

स्त्री सुरक्षितता आणि स्थलांतरित महिलांच्या प्रश्नांवर डॉ. गोऱ्हे यांनी विशेष भर दिला. परदेशात काही महिलांचे पासपोर्ट काढून घेणे, भाषेची अडचण, निवासाची समस्या अशा अनेक तक्रारी समोर येतात. “आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांसाठी एक सुरक्षित ‘विंडो’ निर्माण करण्याबाबत महाराष्ट्र सरकार गंभीर आहे. प्रोटोकॉल विभागात नवीन पदे निर्माण झाली असून लवकरच यावर व्यापक चर्चा होणार आहे,” असे त्यांनी नमूद केले.

उद्योग–धोरणांच्या अंमलबजावणीबाबत बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे जे उद्योग विषयक महिला धोरण राबवत आहे. यामुळे महिला उद्योजकांसाठी मोठ्या संधी निर्माण होत आहेत. पर्यटन क्षेत्रालाही उद्योगाचा दर्जा दिल्याने महाराष्ट्र नवीन दिशा मिळवत आहे.”

परदेशातील तंत्रज्ञान, कचरा व्यवस्थापन, शेतीसंबंधित प्रकल्प, इंडस्ट्री विस्तार, आणि परदेशात स्थायिक झालेल्या मराठी युवा–व्यावसायिकांच्या संधी यावरही त्यांनी प्रकाश टाकला. “परदेशातील अनेक कंपन्या महाराष्ट्रात युनिट्स सुरू करू इच्छितात, पण पायाभूत सुविधांच्या अडचणींमुळे प्रकल्प पुढे जात नाहीत. यावर संयुक्त प्रयत्नांची गरज आहे,” असे त्या म्हणाल्या.

मराठी संस्कृती, साहित्य आणि भाषेच्या पोहोचविषयी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “जगभर मराठी साहित्य संमेलने होतात, परंतु त्यांचे निष्कर्ष, माहिती एकत्रित करून पुढील वाटचालीसाठी देवाणघेवाण होणे आवश्यक आहे. मराठी भाषेची नाळ परदेशातील तरुण पिढीशी मजबूत ठेवण्यासाठी उद्योजक आणि सांस्कृतिक मंडळींनी एकत्रित कृती करणे गरजेचे आहे.”

शेवटी, ग्लोबल मराठी फोरम्सचे फेडरेशन तयार करून सामूहिक पातळीवर काम करण्याचा प्रस्ताव डॉ. गोऱ्हे यांनी मांडला. “महाराष्ट्र आणि मराठी विश्व जागतिक स्तरावर पुढे जाण्यासाठी सज्ज आहे. त्यासाठी आपली भूमिका मजबूत, सर्वसमावेशक आणि सातत्यपूर्ण असली पाहिजे,” असे सांगत त्यांनी सर्व उपस्थितांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या