शाळेच्या चिमुकल्यांसह ग्रामस्थांनी एस.टी.च्या मनमानी कारभाराचा परिवहन मंत्र्यांपुढे वाचला पाढा 12 गावच्या नागरिकांनी परिवहन मंत्र्यांना दिले निवेदन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिव जिल्हा दौर्‍यावर असताना त्यांचा ताफा तामलवाडी येथे थांबवून शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांनी सोलापूर, धाराशिव, लातूर विभागाच्या व तुळजापूर आगार प्रमुखांचा अनागोदी कारभार आज (दि. 29) कथन केला. दरम्यान, 25 वर्षापासून सर्व विभागांच्या जलद व रातराणी बसेसना तामलवाडी येथे थांबा असतानाही एसटी महामंडळाचे चालक-वाहक प्रवासी घेत नाहीत. यामुळे तामलवाडी थांब्याबाबत पंचक्रोशीतील 12 गावच्या ग्रामस्थांनी एकत्रितपणे परिवहन मंत्र्यांकडे एक निवेदनही दिले.

दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी हे गाव 10 ते 12 हजार लोकसंख्यचे गाव आहे. या गावात 10 ते 12 कारखान्यांची मिनी एमआयडीसी आहे; आता मोठी एमआयडीसीही मंजूर आहे. इतकेच नाहीतर या गावातील बसथांब्यावरून पंचक्रोतील 12 गावचे लोक रोज ये-जा करतात. गेल्या 25 वर्षापासून सर्व विभागांच्या जलद व रातराणी बसेसना येथे थांबा असतानाही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अनेक चालक-वाहक मनमानी करीत प्रवासी घेत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, नोकरदारवर्ग, शेतकरीबांधव आदी सर्व प्रवाशांना रोजच नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सोलापूर ते तुळजापूर रोडवर कसल्याही प्रकारची अवैध प्रवासी वाहतूक होत नाही. त्यामुळे तामलवाडी पंचक्रोशीतील दहा- बारा गावच्या ग्रामपंचायतीच्या वतीनेही आज पालकमंत्री सरनाईक यांना निवेदन देवून आपल्या अडचणी मांडल्या.

शालेय पासधारक विद्यार्थांना बसमध्ये घेतले जात नाही, दोन-दोन तास बसची प्रतिक्षा करावी लागते, वारंवार लेखी व तोंडी तक्रारी करून ही एसटी प्रशासकीय अधिकारी दखल घेत नाहीत. हे निदर्शनास आणून दिले. याप्रसंगी उपसरपंच सुधीर पाटील, श्री त्रिंबकेश्‍वर शिक्षण संस्था अध्यक्ष बसवराज मसुते, शिवसेना विभाग प्रमुख मुकूंद गायकवाड, शिवसेना तालुका उपाध्यक्ष निरंजन करंडे, तामलवाडी पोलिस स्टेशनचे स.पोलीस निरिक्षक गोकूळ ठाकूर, ग्रामस्थ मारूती पाटील,प्रमोद गायकवाड, कबीर हेडे, पंकज करंडे, विनायक पवार, सुमित मसुते, सरस्वती विद्यालयाचे प्राचार्य सुहास वडणे, पर्यवेक्षक महादेव मसुते व सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थेट मला फोन करा; मी आता सर्वांना सरळ करतो : परिवहनमंत्री

गावकरी आणि उपस्थित विद्यार्थ्यांच्या भावनांचा विचार करून याप्रसंगी मंत्री महोदयांनी या गावात बस थांबली नाही किंवा शालेय पासधारक विद्यार्थ्यांना बसमध्ये चढू दिले नाहीतर थेट माझ्या टोल फ्रि नंबरवर फोन करण्याचे आवाहन केले आणि मी सर्वांना सरळ करतो असे आश्‍वासन दिले. यापुढे मी तुम्हाला त्रास न होण्याबाबत संबंधितांना आदेश करतो, असेही आश्‍वासित केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या